स्वारातीमच्या महाविद्यालयीन परीक्षांमध्ये गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:34 AM2021-07-14T04:34:39+5:302021-07-14T04:34:39+5:30
१३ जुलैरोजी स्वारातीम विद्यापीठाकडून कला शाखेच्या इतिहास व समाजशास्त्र या विषयाचे दोन पेपर होते, तर विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र, वाणिज्यचा ...
१३ जुलैरोजी स्वारातीम विद्यापीठाकडून कला शाखेच्या इतिहास व समाजशास्त्र या विषयाचे दोन पेपर होते, तर विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र, वाणिज्यचा पर्यावरण शास्त्र या विषयाचे पेपर होते. पहिला पेपर १० ते ११, तर दुसऱ्या पेपरचा २ ते ५ अशी वेळ होती. यातच दिलेल्या वेळेच्या दोन तासांपर्यंत कधीही लिंक ओपन करून पेपर दिला, तर तासाभरात तो सोडवून पूर्ण करायची संधी होती. मात्र अनेक विद्यार्थ्यांना दिलेली लिंकच ओपन होत नसल्याची समस्या येत होती. जर लिंक ओपन झालीच, तर पेपर ओपन झाला नाही. ज्या ठराविक लोकांचा पेपर ओपन झाला, त्यापैकी काहींचा पहिल्या दहा मिनिटांत आपोआपच पेपर सबमिट झाला. ज्यांनी शेवटपर्यंत पेपर सोडविला, त्यांचा पेपर नंतर सबमिट होत नव्हता. आऊट ऑफ टाईम असा संदेश येत होता. त्यामुळे यात नेमक्या किती विद्यार्थ्यांचे पेपर योग्यरित्या सबमिट झाले, हेच कळायला मार्ग नाही.
यात पाठविलेल्या लिंकवर ४० गुणांचा वस्तुनिष्ठ पर्यायी पेपर सोडवायचा होता. आधीच परीक्षांना विलंब झाल्याने विद्यार्थी बुचकळ्यात होते. आता नमनालाच नाट लागल्याने पुन्हा विद्यार्थी गोंधळात पडले आहेत. जर हा पेपर पुन्हा घेतला नाही, तर असेही वाया गेलेले वर्ष पुन्हा एका वर्षाची भर तर टाकणार नाही, अशी चिंता त्यांना लागली आहे. यावरून अनेकजण आपापल्या महाविद्यालयाकडे तक्रारी करीत असल्याचेही दिसून येत होते. या मुलांना नंतर वेळ वाढवून दिल्याचेही महाविद्यालयांनी कळविले. मात्र वाढीव वेळेतही लिंक काही उघडत नव्हती. ज्यांना दुसऱ्या संधीतही पेपर सोडविता आला नाही, अशांचा जीव टांगणीला लागला आहे. तर ज्यांचा पेपर पहिल्या पाच ते दहा मिनिटात सबमिट झाला, त्यांना तर पुढे पेपर सोडवायचीच संधी मिळाली नाही. त्यांचेही नाहक नुकसान होणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातीलच किमान बाराशेपेक्षा जास्त विद्यार्थी पदवीच्या अंतिम वर्षात आहेत. या सर्वांनाच या परीक्षेचा फटका बसण्याची भीती आहे. विद्यापीठाने आपली यंत्रणा व्यवस्थित करूनच पुन्हा परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.
अनेक विद्यार्थ्यांना पेपर सोडविता आला नसल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य यंत्रणा निर्माण करून विद्यापीठाने पुन्हा परीक्षा घेण्याची गरज आहे.
- प्रा. डॉ. विलास आघाव,
उपप्राचार्य, आदर्श महाविद्यालय, हिंगोली