काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जिल्ह्याध्यक्षांनी गाव राखले; भाजपचे जिल्हाध्यक्षांना जनतेचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:31 AM2021-01-19T04:31:31+5:302021-01-19T04:31:31+5:30
हिंगोली जिल्ह्यात आ. राजू नवघरे यांच्या गावात आधीच बिनविरोध निवड झाली, तर आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या गावात निवडणूकच नव्हती. ...
हिंगोली जिल्ह्यात आ. राजू नवघरे यांच्या गावात आधीच बिनविरोध निवड झाली, तर आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या गावात निवडणूकच नव्हती. आ. संतोष बांगर, तर हिंगोलीचे रहिवासी आहेत. मात्र, त्यांनी अनेक ग्रामपंचायतींत बिनविरोधच ताबा मिळविला. तेच सेनेचे जिल्हाप्रमुखही आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. त्यांनी आपल्या विधानसभेत १३५ ग्रामपंचायतीत शिवसेना निवडून आल्याचे सांगितले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेल्या संजय बोंढारे यांनी आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीवरील आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. १७ पैकी १३ जागा जिंकल्या. नांदापुरात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या राष्ट्रवादीच्या पॅनेलने बाजी मारली. माजी जि. प. सदस्य डॉ. वसंतराव देशमुख यांच्या पॅनेलला पराभवाची चव चाखावी लागली. सगळ्यात धक्कादायक म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. शिवाजी जाधव यांना मतदारसंघात तर फारसे यश मिळालेच नाही. गाव असलेल्या किन्होळ्यातच ते दणकून आपटले. भाजपच्या जि. प. सदस्यांचे पती बालाजीराव जाधव यांच्या नेतृत्वात येथे पॅनेल होते. मात्र, सामान्यांनी भाजपच्या पॅनेलला झिडकारले. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्ह्याचा दौरा करून सर्वाधिक ग्रामपंचायती भाजपच्या येतील, असा दावा ज्या जिल्हाध्यक्षांच्या भरवशावर केला, त्यांच्याच गावात कौल विरोधात गेला. त्यामुळे भाजपची जिल्ह्यात पुन्हा बिकट परिस्थितीकडे वाटचाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आ. तान्हाजी मुटकुळे यांनी तरी आपल्या मतदारसंघात काही ग्रामपंचायतींत भाजपला यश मिळवून देण्यात वाटा उचलल्याचे दिसत आहे.