काँग्रेस-राकाँचाच वरचष्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:41 AM2019-01-15T00:41:19+5:302019-01-15T00:41:38+5:30
तालुक्यातील आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी १३ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले. यामध्ये १८ पैकी १0 जागा जिंकून काँग्रेस व राकाँने वर्चस्व मिळविले. मात्र आठ जागा जिंकणारी सेना-भाजप युतीही सत्तेवर दावा करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : तालुक्यातील आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी १३ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले. यामध्ये १८ पैकी १0 जागा जिंकून काँग्रेस व राकाँने वर्चस्व मिळविले. मात्र आठ जागा जिंकणारी सेना-भाजप युतीही सत्तेवर दावा करीत आहे.
१४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेपासून १३ टोबलवर सहा फेऱ्याद्वारे मतमोजणीचे नियोजन करण्यात आले. दुपारी ३ वाजेपर्यत निकाल घोषित करण्यात आला. जलालधाबा येथील दोन उमेदवारामंध्ये एका मताचा फरक असल्याने दुबार मतमोजणी झाली. यात एक तासाच्या वर वेळ लागला.
जलालधाबा गणातील विठ्ठल पोले यांना ७६१ मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी गणेश लोंढे यांना ७६० मते पडली. गणेश लोंढे यांनी फेरमतमोजणी करण्याची विनंती निवडणूक निर्णय अधिकाºयाकडे केली. त्यानुसार फेरमतमोजणी होऊन विठ्ठल पोले यांना ७६१ तर गणेश लोंढे यांना ७५९ मते पडली.
निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खेडेकर तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांनी विठ्ठल पोले यांना विजयी घोषित केले. मतमोजणीस तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे, गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी, गटशिक्षणाधिकारी राजेश पातळे, सतीश पाठक, विलास तेलंग, श्रीराम पाचपुते, पी.एन ऋषि, जी.एस. राहीरे, व्यंकट केंद्रे, शिवसाब घेवारे आदी उपस्थित होते.
नवनिर्वाचित संचालक हलविले
निवडणुकीतील बिनविरोधपैकी कुणी संभ्रम केल्यास संख्या समसमान होणार असल्यामुळे पळवापळवीची दाट शक्यता आहे. दोन्ही बाजूने आपल्या पॅनलचे विजयी उमेदवार सुरक्षितस्थळी तातडीने हलविल्याचे वृत्त आहे. खबरदारीचा उपाय म्हणून असे करण्यात आले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. कोणताच धोका पत्करायचा नाही असे सूचक विधान त्यांनी केले.
दोन दत्तांमध्ये पुन्हा झुंज
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांचे चिरंजीव दत्ता बोंढारे व माजी खासदार शिवाजी माने यांचे पुतणे दत्ता माने यांच्यामध्येच सभापतीपदासाठी झुंज होणार आहे. प्रशासक म्हणून दत्ता माने यांची निवड जवळपास निश्चित झाल्यानंतर संजय बोंढारे यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावून त्याला स्थगिती मिळविली होती. निवडणूक घेण्यासाठी कोर्टाला विनंती केली. त्यामुळे प्रशासक पद निश्चित झाल्यानंतरही ते दत्ता माने यांना मिळाले नाही. त्यामुळे दोन्ही दत्तांमध्ये आताही सभापतीपदासाठी चुरस असणार आहे.
हे आहेत विजयी उमेदवार
बाळापूर- दत्ता बोंढारे-१३२० मते
शेवाळा- दत्तत्रय माने १३५९
घोडा- भरत देशमुख ११५८
कांडली- किशनराव कोकरे ११७८
वारंगा फाटा -नितीन कदम १०५८
डोंगरकडा -मीराबाई अडकिणे १४६५
जवळा पां.- मारोती पवार बिनविरोध
दांडेगाव -साहेबराव जाधव बिनविरोध
पेठवडगाव -बालासाहेब पतंगे १०३०
सिंदगी -अनिल रणखांब बिनविरोध
नांदापूर -वसंतराव देशमुख ९३०
पिंपळदरी-संजय भुरके १०४८
जलालधाबा-विठ्ठलराव पोले ७६१
लाख- कावेराबाई साबळे बिनविरोध
कोथळज - धुरपत पाईकराव ९६२
व्यापारी - सुनील अमिलकंठवार १७
व्यापारी -बालासाहेब गावंडे २०
हमाल-मापाडी - शेख गौस २४
ईश्वरचिठ्ठी काँग्रेसच्या पारड्यात....
व्यापारी मतदारसंघात अटीतटीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष महेश गोविंदवार व काँग्रेसचे सुनील अमिलकंठवार यांना बरोबरीची मते पडली. त्यानंतर ईश्वरचिठ्ठी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात भाग्य काँग्रेसच्या पदरात पडले आणि काँग्रेसचे सुनील अमिलकंठवार यांची यांना विजयी म्हणून घोषित केले. याच जागेने बहुमताचा आकडा गाठला.
घोषणांनी परिसर दुमदुमला
विजयी उमेदवार जाहीर होताच कार्यकर्ते जल्लोष करत विजयाच्या घोषणा देत होते. गुलालाची उधळण होत होती. तहसील समोर हिंगोली-नांदेड मुख्य रस्त्यावर कार्यकर्ते गर्दी करत होते.