वसतिगृह इमारतीचे बांधकाम रामभरोसे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:24 AM2018-11-20T00:24:38+5:302018-11-20T00:25:24+5:30
माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत हिंगोली शहरातील जि. प. शाळेच्या परिसरात मुलींच्या वसतिगृहाची टोलेजंग इमारत उभारण्यात येत आहे. विशेष म्हणजे इमारतीचे बांधकाम देखरीखीविना प्रगतिपथावर आहे. इमारतीची जागा निश्चितीवरून व ठराव न घेताच बांधकाम सुरू केल्याने यावरून जि. प. प्रशासनात मोठा वादही झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत हिंगोली शहरातील जि. प. शाळेच्या परिसरात मुलींच्या वसतिगृहाची टोलेजंग इमारत उभारण्यात येत आहे. विशेष म्हणजे इमारतीचे बांधकाम देखरीखीविना प्रगतिपथावर आहे. इमारतीची जागा निश्चितीवरून व ठराव न घेताच बांधकाम सुरू केल्याने यावरून जि. प. प्रशासनात मोठा वादही झाला होता.
मुलींच्या शिक्षणात हिंगोलीचा समावेश अप्रगत गटात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मुलींना वसतिगृहात प्रवेशित करून त्यांना शिक्षण देण्याची धडपड शासनाकडून केली जात आहे. त्या अनुषंगाने नवीन वसतिगृहाच्या इमातीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. जि. प. बहुविध प्रशालेच्या प्रांगणातील जागेत बांधकाम सुरू आहे. सदर बांधकाम कोणाच्या परवानगीवरून केले जात आहे, जागा निश्चित कोणी केली. कामाचा ठराव घेतला होता का? यासह विविध प्रश्नांमुळे नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रश्न निर्माण झाला होता. शिवाय बांधकामाचा मुद्दाही जिल्हा परिषदेत गाजला होता. त्यामुळे अनेक दिवस काम लटकले होते.
विशेष म्हणजे मुलींच्या वसतिगृहाची सुसज्ज इमारत उभारली जात असली तरी, बांधकामावर संबंधित प्रशाकीय अधिकारी कधीच फिरकत नाहीत. गुत्तेदाराकडून दर्जात्मक काम केले जात आहे का? सिमेंट, मातीमिश्रित वाळूचा वापर होत आहे का? यासह अनेक बाबीवर लक्ष देण्यासाठी येथे कोणीच आढळून येत नाही. बांधकामावरही राज्य स्तरावरूनच नियंत्रण ठेवले जात असल्याचे सोयीस्कर उत्तर शिक्षण विभागाकडून दिले जाते.
मुलींचे वसतिगृह असल्याने ते लोकवस्तीत उभारले जावे, अशी प्रशासनाची योग्य भूमिका होती. त्यामुळे हिंगोली येथील जि. प. बहुविध प्रशालेच्या मैदानावरील जागा निश्चित करण्यात आली. परंतु बांधकाम मात्र रामभरोसे सुरू असल्याचे चित्र आहे.