हिंगोलीच्या कार्यकारी अभियंत्यासह कंत्राटी सहायक एसीबीच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 07:37 PM2020-09-17T19:37:18+5:302020-09-17T19:37:37+5:30
कार्यकारी अभियंता यांनी कंत्राटी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांना रक्कम देण्याचे सूचित केले
हिंगोली : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंता कार्यालयातील कनिष्ठ लेखाधिकारी पदाचा कार्यभार देण्यासाठी पाच हजाराची लाच मागणारा कार्यकारी अभियंता सविता नागेश शालगर व कंत्राटी सहायक विनोद दामोदर धाडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी ताब्यात घेतले़
फिर्यादीने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या हिंगोली कार्यालयात कनिष्ठ लेखाधिकारी पदाचा कारभार व त्यांचे कॅश मॅनेजमेंट प्रोडक्ट सीएमपी अॅक्टीव्हेट करून देण्यासाठी कार्यकारी अभियंता सविता शालगर यांची भेट घेतली़ यासाठी शालगर यांनी ५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचा आरोप फिर्यादीने केला.
ही रक्कम त्यांनी कंत्राटी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक विनोद धाडे यांच्याकडे देण्याचे सूचित केले होते़ या प्रकरणी फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला़ १५ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणीदरम्यान धाडे यांनी फिर्यादीकडून पाच हजार रुपयांची मागणी केली़ बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून धाडे यांना लाच स्वीकारताना ताब्यात घेतले़ तसेच शालगर यांनाही ताब्यात घेण्यात आले़
याप्रकरणी हिंगोली पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधीक्षिका कल्पना बारावकर, अप्पर पोलीस अधीक्षिका अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक हणमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.