कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना फरकाचे ४.५२ कोटी मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:30 AM2021-05-26T04:30:35+5:302021-05-26T04:30:35+5:30
हिंगोली : एनआरएचएम अंतर्गत कार्यरत आरोग्य विभागातील जवळपास ४०० कर्मचाऱ्यांना फरकाच्या रक्कमेपोटी जवळपास ४.५२ कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र ...
हिंगोली : एनआरएचएम अंतर्गत कार्यरत आरोग्य विभागातील जवळपास ४०० कर्मचाऱ्यांना फरकाच्या रक्कमेपोटी जवळपास ४.५२ कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र तांत्रिक चुकीमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन कमी निघाले असून ते दुरुस्त करुन फरकाची रक्कमही देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी उपाध्यक्ष मनीष आखरे यांच्याकडे केली.
हिंगोली जिल्ह्यात एनआरएचएममध्ये जवळपास ४०० कर्मचारी आहेत. यापैकी अनेकजण २०१८ च्या पूर्वीपासून कार्यरत आहेत. २०१८ मध्ये या कर्मचाऱ्यांना ५ टक्के वेतनवाढीची घोषणा झाली होती. मात्र ती मिळाली नव्हती. त्याचा राज्य स्तरावरून फॉर्म्युला ठरल्याप्रमाणे आकडेमोड करून डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी, औषध निर्माता, मसाजर आदींना कागदावर प्रत्यक्ष किती रक्कम मिळणार हे दाखविण्यात आले. ही बाब मंजूर आहे का? अशी विचारणा करून मंजूर असल्यास स्वाक्षऱ्या घेतल्या. मात्र ऑनलाईन करताना काम उत्कृष्ट असल्याचा शेरा नमूद करूनही वरच्या कॉलममध्ये नो म्हटल्याने पगारवाढ मिळाली नाही. त्यामुळे एकेका कर्मचाऱ्यांचे तीस ते पन्नास हजारांचे नुकसान होत आहे. शिवाय वेतनातही दोन ते अडीच हजारांचा फरक पडत आहे. इतर जिल्ह्यांत मात्र कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा पूर्ण लाभ मिळाला असताना हिंगोली जिल्ह्यातच हा प्रकार घडला. याबाबत कर्मचाऱ्यांनी आज जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसेच या वेतनवाढीसाठी आधी जि.प.उपाध्यक्ष मनीष आखरे यांनी पाठपुरावा केला होता. याबद्दल त्यांचा सत्कार करून वेतनवाढीचा फरक मिळवून देत वेतनवाढ करण्याची मागणी या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी शेकडो कर्मचारी उपस्थित होते.