‘एकच नारा, कायम करा’; कंत्राटी आरोग्य अधिकारी, कर्मचारी संपावर; आरोग्य सेवा सलाइनवर

By रमेश वाबळे | Published: October 25, 2023 07:42 PM2023-10-25T19:42:05+5:302023-10-25T19:42:24+5:30

१५ वर्षांपासून समायोजनाच्या प्रतीक्षेत; जिल्ह्यातील पाचशेंच्या वर कर्मचारी संपात सहभागी

Contractual Health Officers, Staff on Strike; On health care saline in Hingoli | ‘एकच नारा, कायम करा’; कंत्राटी आरोग्य अधिकारी, कर्मचारी संपावर; आरोग्य सेवा सलाइनवर

‘एकच नारा, कायम करा’; कंत्राटी आरोग्य अधिकारी, कर्मचारी संपावर; आरोग्य सेवा सलाइनवर

हिंगोली : जवळपास दीड दशकापासून आरोग्य सेवा बजावत असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शासन सेवेत समायोजन करावे, या मागणीसाठी २५ ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचा परिणाम आरोग्य सेवेवर झाल्याचे पहावयास मिळाले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी व कर्मचारी तुटपुंजा मानधनात सेवा बजावतात. सध्याच्या महागाईच्या काळात हाती पडणाऱ्या मानधनात काम करणे शक्य होत नसल्यामुळे शासन सेवेत समायोजन करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी मागील अनेक वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. परंतु, अद्यापही समायोजनचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी डाॅक्टर, कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

मागणीसंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. कैलास शेळके यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पुण्यरथा कांबळे, डाॅ. इंदू पेटके, राहुल घुगे, वैशाली काईट, रेखा टेकाळे, अनुराधा पथरोड, एस. एस. ढवळे, अर्चना पवार, गंगाधर बेंगाणे, डाॅ. शिवाजी विसलकर, डाॅ. टाक, डाॅ. डी. एम. चव्हाण, डाॅ. वसुंधरा खैरे, एस. जी. इंगोले, डाॅ. दीपक मोरे, डाॅ. अमोल दरगू, डाॅ. राजू नरवाडे, डाॅ. एस. आर. देशमुख, सचिन रुपूरकर, डाॅ. सुचिता हिंगोले, डाॅ. विद्या देवकते, डाॅ. कैलास पवार, डाॅ. गायत्री अग्रवाल आदींची उपस्थिती होती.

‘एकच नारा, कायम करा’...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मंगळवारी सकाळी १०:३० च्या सुमारास कंत्राटी आरोग्य अधिकारी, कर्मचारी एकत्र जमले होते. या ठिकाणी शासन सेवेत समावून घेण्याची मागणी करीत कर्मचाऱ्यांनी ‘एकच नारा, कायम करा’ अशा घोषणा देत शासनाचे लक्ष वेधले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन देण्यात आले.

Web Title: Contractual Health Officers, Staff on Strike; On health care saline in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.