वसमत येथील राडाप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:25 AM2021-01-15T04:25:08+5:302021-01-15T04:25:08+5:30
वसमत : वसमत येथे घडलेल्या फिल्मीस्टाईल राड्यानंतर परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक ...
वसमत : वसमत येथे घडलेल्या फिल्मीस्टाईल राड्यानंतर परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
वसमत येथे बुधवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी चौकाजवळील ऑटोमोबाइलसमोर जुन्या वादातून हाणामारी झाली. हाणामारीत एक जण जखमी झाला आहे. या घटनेतील पिस्तूल पोलिसांनी जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. वेळीच पोलिसांनी कारवाई केल्याने अनर्थ टळला आहे. याप्रकरणी अब्दुल सईद फारुखी यांनी तक्रार दिली आहे. चाकू व कुऱ्हाडीने हल्ला चढवून जखमी केले. या तक्रारीवरून आजम फारुखी ऊर्फ सरफराज व दानीयल महेमूद ऊर्फ साजेद या दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे यांनी दिली.
आजम फारुखी ऊर्फ सरफराजने तक्रार दिली की, जुन्या वादातून शिवीगाळ करून हल्ला केला. गावठी पिस्तूल काढून धमकाविल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवरून अब्दुल सईद फारुखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील अब्दुल सईद जखमी असून, नांदेडला उपचारासाठी दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वसमत येथे घटना घडल्यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे यांनी तातडीने पोलीस बंदोबस्त वाढवून परिस्थिती आटोक्यात आणली. सपोनि पी. सी. बोधनापोड, सपोनि श्रीदेवी पाटील, पोलीस कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी केली. सदर घटनेचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे. घटनेमागचे नेमके कारण शोधून घातक शस्त्रसाठा कोठून आला याचाही शोध लावण्यात येणार असल्याचे गुरमे यांनी सांगितले.