घरफोडीच्या ७ गुन्ह्यात शिक्षा भोगली; बाहेर येताच चोरट्याने पुन्हा वकीलाचे घर फोडले
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: May 21, 2024 05:53 PM2024-05-21T17:53:30+5:302024-05-21T17:59:52+5:30
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले; मुद्देमाल केला जप्त
हिंगोली : मराठवाडा व विदर्भात ५० वर्षाच्या काळात २५ ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. विशेष म्हणजे घरफोडीच्या ७ गुन्ह्यात कारवासाची शिक्षाही त्याने भोगली आहे. शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा त्याने हिंगोलीत एका वकिलाचे घर फोडले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिदास कुंडलिक भगत (वय ६०,रा. भेंडगाव ता. बार्शी टाकळी जि. अकोला) असे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. हिंगोली शहरातील अजयनगरात एका वकिलाच्या घरी २ जानेवारी २०२४ रोजी चोरीची घटना घडली होती. या घटनेतील चोरट्याचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थागुशा पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने चोरट्याचा शोध सुरू केला होता. २१ मे रोजी हे पथक गस्त घालत होते.
यावेळी वकीलाच्या घरी चोरी केलेला चोरटा हिंगोली रेल्वे स्टेशन परिसरात आला असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने रेल्वे स्टेशन परिसर गाठत हरिदास कुंडलिक भगत यास ताब्यात घेतले. त्यास विचारपूस केली असता त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याचेकडून गुन्ह्यात चोरलेली रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेला लोखंडी चाकू, रॉड, स्क्रु ड्रायव्हर, बॅटरी, गुलेर असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
दरम्यान, हरिदास भगत याने मागील ५० वर्षात विदर्भ व मराठवाड्यात अनेक घरफोड्या केल्या. जवळपास २५ घरफोड्यांचे रेकॉर्ड पोलिसांना उपलब्ध झाले आहे. तसेच न्यायालयाने त्यास आतापर्यंत ७ घरफोड्यांमध्ये दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. कारावास भोगून आल्यानंतर पुन्हा तो घरफोड्या करीत होता. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार नितीन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली.