समन्वयाने जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:14 AM2018-11-16T00:14:02+5:302018-11-16T00:14:26+5:30
जिल्ह्याच्या विकासात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेने समन्वय आणि सहकार्य करत आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करु, असे प्रतिपादन नवनियुक्त जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्याच्या विकासात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेने समन्वय आणि सहकार्य करत आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करु, असे प्रतिपादन नवनियुक्त जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी. सभागृहात आयोजित स्वागत व निरोप कार्यक्रमात जयवंशी हे बोलत होते. यावेळी मावळते जिल्हाधिकारी अनिल भंडारी, श्रीमती भंडारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, पोलिस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणवीरकर यांची उपस्थिती होती.
यावेळी जयवंशी म्हणाले की, हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून जिल्ह्याची विकासाकडे यशस्वी वाटचाल सुरु आहे. परंतु हिंगोली जिल्ह्यात स्त्रोत कमी आणि आव्हाने अधिक आहेत. याकरिता सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवत व सहकार्य करत जिल्ह्याच्या विकासकामासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. भंडारी यांनी जिल्ह्याच्या विकासाची जी परंपरा सुरु केली आहे. ती अशीच आपण पुढे ही चालू ठेवू, असेही जयवंशी यावेळी म्हणाले.
भंडारी म्हणाले की, हिंगोलीतील सुमारे सव्वादोन वर्षाच्या कार्यकाळात अनेक आव्हाने सामोरे होती. परंतु सर्वांचे सहकार्य व समन्वयाने प्रत्येक आव्हान स्वीकारत यशस्वी कामे करता आली. जलयुक्त शिवार, लिगो, राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे मार्ग भूसंपादन, सातबारा संगणकीकरण असे अनेक महत्त्वपूर्ण कामे करता आली. हिंगोली जिल्ह्यातील कार्यकाळ माझ्या जीवनातीत अविस्मरणीय क्षण असल्याचे ही भंडारी यावेळी म्हणाले.
प्रास्ताविक अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार यांनी केले. तसेच यावेळी सीईओ तुम्मोड, योगेश कुमार, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर आदींची समयोचित भाषणे झाली.
यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख, कर्मचारी, पत्रकार, स्वयंसेवी स्ंसथांचे प्रमुख, विविध संघटनाचे प्रमुख यांनी पुष्पगुच्छ देत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे स्वागत आणि माजी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना निरोप दिला.