कोरोना मृत्यूनंतर रक्ताच्या नात्यानेही त्यांना नाकारले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:37 AM2021-04-30T04:37:58+5:302021-04-30T04:37:58+5:30
२३ मार्च २०२० पासून कोरोना महामारीचा शिरकाव सर्वत्र झाला आहे. गत दीड वर्षात नगरपालिका कर्मचाऱ्यांनी जवळपास २५ बेवारस मयतांवर ...
२३ मार्च २०२० पासून कोरोना महामारीचा शिरकाव सर्वत्र झाला आहे. गत दीड वर्षात नगरपालिका कर्मचाऱ्यांनी जवळपास २५ बेवारस मयतांवर अंत्यसंस्कार केले आहेत. अंत्यसंस्काराच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे कर्मचारी नातेवाइकांची वाट पाहत बसतात. नातेवाईक नाही आल्यास बेवारस मयताचा अंत्यविधी उरकून घेतात. नगरपालिकेने अंत्यविधीसाठी ठरावीक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये माधव सुकते, नवनाथ ठोंबरे, काशीनाथ लगड, चेतन बुजगावणे, अशोक गालफाडे, रवी गायकवाड, दिनकर शिंदे यांचा समावेश आहे.
अंत्यविधीसमयी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना पीपीई कीट परिधान करण्यास सांगितले जाते. अंत्यविधी उरकला की सदरील कीट ही जाळून टाकण्यात येते. परत नव्याने दुसरी पीपीई कीट दिली जाते. गत दीड वर्षापासून मुख्याधिकारी डाॅ. अजय कुरवाडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त केलेले कर्मचारी बेवारस मयतांवर अंत्यविधी करीत आहेत.
शासनाने अंत्यविधी दरम्यान नातेवाइकांची गर्दी होऊ नये म्हणून कडक सूचना दिलेल्या आहेत. अंत्यविधीच्या ठिकाणी केवळ पाच व्यक्तींनीच उपस्थित राहावे. मयताचा नातेवाईक नाही आल्यास त्याची वाट पाहिल्या जाते. परंतु, शेवटी नगरपालिकेने नेमलेले कर्मचारी सूचनांचे पालन करत मयतावर अंत्यविधी करून टाकतात.
कोरोना मृत्यूनंतर रक्ताचे नातेवाईकही जवळ येत नाहीत. ही मोठी शोकांतिका आहे. काय पाप केले असेल या मयत व्यक्तीने? असा प्रश्न उपस्थित होतो. अंत्यसंस्कार करताना आमच्याही डोळ्यात पाणी येते, अशी प्रतिक्रिया नियुक्त केलेल्या नगरपालिका कर्मचाऱ्यांनी दिली.