जिल्ह्यात कोरोना आला अन् डेंग्यू पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:51 AM2021-02-05T07:51:44+5:302021-02-05T07:51:44+5:30
हिंगोली : दरवर्षीच्या तुलनेत २०२० मध्ये जिल्ह्यात केवळ २ रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. ...
हिंगोली : दरवर्षीच्या तुलनेत २०२० मध्ये जिल्ह्यात केवळ २ रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
जिल्ह्यात पाच वर्षाचा आलेख पाहिला असता २०१८ या वर्षात सर्वात जास्त म्हणजे १८ रुग्ण आढळून आलेले आहेत. २०१६ मध्ये ९ रुग्ण, २०१७ मध्ये ५ रुग्ण, २०१९ मध्ये ५ आणि २०२० मध्ये केवळ २ रुग्ण आढळून आले आहेत.
‘एडीस इजिप्ती’ नावाचा हा डेंग्यू रक्तस्रवात्मक तापाचा कीटक आहे. हा एक लहान डास असून, त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात. शरीरात विषाणू तयार करायला सात ते आठ दिवस दिवस घेतो. त्यानंतर रोगाचा प्रसार सुरू होतो. डेंग्यूचा आजार झाल्यास उपचारापेक्षा खबरदारी केव्हाही चांगली आहे. डेंग्यू, ‘डीएचएफ’च्या उपचारासाठी कोणेही औषध किंवा लस नाही. एडीस इजिप्ती डासावर नियंत्रण मिळविणे हाच एकमेव उपाय आहे.
कोरोना काळात हिवताप कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील ७११ गावांमध्ये सर्व्हे करण्यात आला. घरांची तपासणी करून प्रत्येक घरातील साठवणीतील भांड्यातील पाणी तपासले. यावेळी पाण्यात मिसळण्यासाठी ‘अबेट’ नावाचे औषधही देण्यात आले.
सर्व्हे
२३ मार्चपासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. या काळामध्ये जिल्ह्यातील ७११ गावांमध्ये हिवताप कार्यालयाच्या वतीने सर्व्हे करण्यात आला. आशा वर्कर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्फत राउंड घेण्यात आला. याचबरोबर ३० गावांमध्ये धूर फवारणी करण्यात आली. कोरोना काळात अबेटिंग राउंड ६ घेण्यात आले. सर्व्हेदरम्यान, घरातील पाणी साठवण्याच्या भांड्यात अबेट नावाचे औषधाचे द्रावण तयार करून टाकले. २०२० या वर्षात डेंग्यूचे केवळ दोनच रुग्ण आढळले. डॉ. गणेश जोगदंड, जिल्हा हिवताप अधिकारी, हिंगोली
डेंग्यूची लक्षणे
एकदम जोराचा ताप चढणे. डोक्याच्या पुढचा भाग अतिशय दुखणे. डोळ्याच्या वरच्या भागात वेदना होणे.
डोळ्यांच्या जळजळीसोबत स्नायू, सांध्यात वेदना होणे. चव, भूक नष्ट होणे. छातीवर गोवरासारखी पुरळ येणे.
त्वचा चिकट किंवा फिकट होणे. झोप न येणे. अस्वस्थता वाटणे.
डेंग्यू झाल्यास श्वास घेण्यास त्रास होणे. कितीही पाणी पिले तरी भूक लागत नाही. डेंग्यूच्या रुग्णाची भूक मंदावते. कारण त्याच्या अंगात ताप भिनलेला असतो.