कोरोनाने हिरावले २२ महिलांच्या कपाळावरील कुंकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:20 AM2021-06-11T04:20:55+5:302021-06-11T04:20:55+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची लाट ओसरत चालली असली तरी, याचा अनेकांना फटका बसला आहे. जिल्ह्यातील ४९ बालकांच्या पालकांना ...
हिंगोली : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची लाट ओसरत चालली असली तरी, याचा अनेकांना फटका बसला आहे. जिल्ह्यातील ४९ बालकांच्या पालकांना हिरावल्यानंतर आता २२ महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसण्याचे काम कोरोनाने केले आहे. कोरोनाने पती हिरावलेल्या महिलांचा शोध घेण्याचे काम महिला व बालविकास विभागाच्या वतीने केले जात आहे. त्यामुळे आणखी संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोना संसर्गाची लाट आता कुठे ओसरत चालली असली तरी, मागील दीड वर्षात कोरोनाने चांगलाच धूमाकूळ घातला आहे. दुसऱ्या लाटेत तर दररोज शेकडो रूग्ण आढळून येत होती. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांचा आकडा १५ हजार ८२६ वर पोहचला. यात जिल्हाभरात ३७१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. घरातील कमावता व्यक्तीच गेल्याने कुटुंबियांवर मोठे संकट ओढावले आहे. त्यामुळे पुढे कसे जगायचे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा टाकला आहे. यात ४९ बालकांनी पालक गमावल्याने त्यांच्या पालन पोषणाचा प्रश्नही निर्माण झाला होता. मात्र शासनाने पुढाकार घेत १८ वर्षांखालील बालकांच्या पालन पोषणासाठी दर महिन्याला मानधन देण्याचा निर्णय घेतला. अशा बालकांच्या पालन पोषणाचा प्रश्न सोडविण्यात शासनाला यश आले असले तरी, आता कोरोनाने २२ महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा निराधार महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करणार आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रूग्ण -
बरे झालेल्या रूग्णांची संख्या -
सध्या उपचार घेत असलेले रूग्ण -
सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ मिळणार
कोरोनामुळे पतीचे निधन झालेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी महिला व बालविकास विभागाने काही कर्मचारी कामाला लावले आहेत. अशा महिलांची माहिती संकलित करून त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती योजना, विधवा आदी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. तसेच दारिद्र्य रेषेखालील पात्र लाभार्थी असल्यास अशा लाभार्थ्यांना एका वेळेस २० हजार रूपयांचे अनुदानही देण्याचा प्रयत्न केला जाणार आहेे. त्यामुळे कोरोनाने पती गमावलेल्या महिलांची माहिती असल्यास महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन या विभागाने केले आहे.
कोरोनाने २२ महिलांना केले निराधार
येथील महिला व बालविकास विभागाच्या वतीने पालक गमावलेल्या बालकांची व पती गमावलेल्या महिलांची माहिती संकलीत केली जात आहे. आतापर्यंत या विभागाकडे २२ महिलांची माहिती संकलीत झाली असून ४९ बालकांची माहिती गोळा करण्यात यश आले आहे. यामध्ये २७ मुले व २२ मुलींचा समावेश आहे. तसेच दोन्ही पालक गमावलेला एक बालकही आढळून आला आहे. जमा केलेली माहिती शासनाकडे सादर केली जाणार आहे.
कोरोनाने पती गमावलेल्या महिलांची माहिती संकलीत करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली जाणार आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांना सामाजिक अर्थसहाय्य योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी, नातेवाईकांनी अशा महिलांची माहिती असल्यास महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधावा.
- विठ्ठल शिंदे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी