कोरोनाने हिरावले २१ बालकांचे पालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:31 AM2021-05-27T04:31:38+5:302021-05-27T04:31:38+5:30
हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, आतापर्यंत ३३८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक नुकसान पालक गमावलेल्या २१ ...
हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, आतापर्यंत ३३८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक नुकसान पालक गमावलेल्या २१ बालकांचे झाले आहे. अशा बालकांना मदत व्हावी, यासाठी शासनाने मदतीचा हात पुढे केला असून, अशा बालकांचा शोध घेतला जात आहे.
जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. २५ मे पर्यंत जिल्ह्यात १५ हजार ३७८ रुग्ण आढळून आले आहेत. यातील १४ हजार ६४० रुग्ण बरे झाले असले तरी ३३८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. घरातील कर्ता व्यक्ती कोरोनाने हिरावल्याने कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. यात सर्वाधिक नुकसान पालक गमावलेल्या बालकांचे झाले आहे. अशा बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची, तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करीसारख्या गुन्ह्यामध्ये ओढली जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत कोरोनामुळे पालक गमावलेली २१ बालके आढळून आली आहेत. या बालकांना शासनाने मदतीचा हात पुढे केला असून, यासाठी जिल्हास्तरावर कृतिदल स्थापन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अध्यक्ष असणार असून, पोलीस अधीक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी टास्क फोर्सचे सदस्य सचिव आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी कृती दल समितीची बैठक घेऊन कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला असल्यास ११०० रुपयांची मदत
- कोरोनामुळे आई किंवा वडील यापैकी एका पालकाचा मृत्यू झाल्यास अशा बालकांच्या संगोपनासाठी प्रती महिना ११०० रुपये देण्यात येणार आहेत.
- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने ही रक्कम थेट एकल पालकाच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
- जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे २१ बालकांनी आई किंवा वडील यापैकी एका पालकाला गमावले आहे.
अनाथ मुलांचे सरकार काय करणार ...
१) कोरोनामुळे आई-वडील दोन्ही गमावलेल्या ० ते १८ वयोगटांतील बालकांना बाल संगोपन योजनेअंतर्गत लाभ देणे, बालकाचा ताबा नातेवाइकांकडे देण्याच्या शक्यतेबाबत पडताळणी करणे.
२) टास्क फोर्सच्या माध्यमातून बालकांना सर्वतोपरी संरक्षण उपलब्ध करून देणे, अशी बालके शोषणास बळी पडणार नाहीत याची दक्षता घेणे, त्याचे कायदेशीर हक्क मिळवून देणे.
३) आवश्यकता असल्यास बालकांचे समुपदेशन करणे, तसेच बालगृहामध्ये दाखल करणे.
प्रतिक्रिया ...
कोरोनामुळे आई-बाबा गमावलेल्या बालकांना टास्क फोर्सच्या माध्यमातून मदत देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. आई किंवा बाबा यापैकी एक पालक गमावलेले २१ बालके आढळली आहेत. अशी आणखी बालके आहेत का याचा शोधही घेतला जात आहे.
- विठ्ठल शिंदे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
कोरोनाने आई किंवा बाबा हिरावलेल्याची संख्या - २१
मुले - ९
मुली - १२