कोरोना महामारीमुळे चारा विक्रीलाही बसलाय फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:48 AM2021-05-05T04:48:37+5:302021-05-05T04:48:37+5:30
हिंगोली : कोरोना महामारीचा चारा विक्री व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून, पोट कसे भरावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
हिंगोली : कोरोना महामारीचा चारा विक्री व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून, पोट कसे भरावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चारा पेंडीमागे दोन रुपये मिळायचे तेही कोरोनाने हिसकावून घेतले आहेत. मागील दोन-तीन महिन्यांपासून कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याचे पाहून शासनाने संचारबंदी लागू केली आहे. कोरोनाआधी हिरव्या चाऱ्याला चांगली मागणी होती. परंतु, गत दोन वर्षांपासून हिरवा चारा विक्री करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनाआधी दोनशे ते तीनशे रुपये पदरात पडायचे. परंतु, कोरोनामुळे आता १०० रुपयेही पदरात पडत नाहीत. त्यामुळे घरातील सदस्यांचे पोट कसे भरावे? असा प्रश्न पडला आहे.
७० वर्षांच्या उमाबाई म्हणाल्या, मी तीस वर्षांपासून चारा विक्री करत आहे. परंतु, असे दिवस कधीच पाहिले नाहीत. मागच्या वर्षी शासनाने अन्नधान्य दिले होते. परंतु, यावेळेस अन्नधान्यही कोणी दिले नाही. घरात मुलगा रिक्षा चालवतो. त्याला हातभार म्हणून मी चारा विक्री करते. परंतु, कोरोनामुळे लागू केलेल्या संचारबंदीमुळे उपाशी राहण्याची वेळ माझ्या कुटुंबावर आली आहे.
शासनाने आर्थिक मदत द्यावी
शहरातील खटकाळी, अकोला रोड आदी ठिकाणी चारा विक्री करणारे सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत बसलेले असतात. परंतु, सध्या त्यांना संचारबंदीमुळे बसता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने आर्थिक मदत करावी.
उमाबाई कोल्हापुरे, चारा विक्रेता