हिंगोली जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा स्फोट; तब्बल ५८ रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 08:00 PM2020-08-06T20:00:05+5:302020-08-06T20:01:59+5:30
हिंगोली शहरातच रुग्णसंख्या वाढत चालल्याचे चित्र दिसून येत आहे.
हिंगोली : जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा स्फोट झाला असून गुरूवारी एकाच दिवशी तब्बल ५८ रुग्ण आढळून आले आहेत. मागील तीन दिवसांत रुग्णांचे कमी झालेले प्रमाण पुन्हा वाढले आहे. हिंगोली शहरातच रुग्णसंख्या वाढत चालल्याचे चित्र दिसून येत आहे.
आज नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये महसूल कॉलनी १, पलटन ३, साईनगर कळमनुरी २ असे सहा रुग्ण अँटीजन टेस्ट केल्यानंतर समोर आले आहेत. यामध्ये एकजण जिल्हाधिकाऱ्यांचा चालक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तर थ्रोट स्वॅब घेतलेल्या ५२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सरस्वतीनगर १, पेन्शनपुरा १, रिसाला बाजार २, जि.प. क्वाटर्स १, देवगल्ली १, सन्मती कॉलनी ३, गाडीपुरा ९, न.प. कॉलनी ३, महादेववाडी १, वंजारवाडा ३, तोफखाना २ असे हिंगोलीत आढळलेले रुग्ण आहेत. हिंगोली तालुक्यातील बोरीशिकारी १, सेनगाव तालुक्यातील गोरेगाव ४, गोंदनखेडा १, वसमत येथील ६, वसमत तालुक्यातील वापटी १, पं.स. वसमत १, जुमा पेठ वसमत १, चिखली १, कळंबा १, सती पांगरा १, कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा २, विद्यानगर १, भीमनगर ३, बीएसएनएल टॉवरजवळ १ असे ५२ आढळून आले आहेत.
आज घरी सोडलेल्यांमध्ये हिंगोलीच्या आयसोलेशन वार्डातील विठ्ठल कॉलनीचा १ व वंजारवाडा १, कोरोना केअर सेंटर लिंबाळा येथून मंगळवारा भागातील तिघांना घरी सोडले आहे. आजपर्यंतची रुग्णसंख्या आता ७९६ वर पोहोचली आहे. यापैकी ५५५ जण बरे झाले आहेत. तर सध्या विविध कोरोना केअर सेंटरमध्ये २३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ८ जणांचा कोरोनाच्या आजाराने मृत्यू झाला आहे.
१२ जणांची प्रकृती गंभीर
हिंगोलीच्या आयसोलेशन वार्डातील सात जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना आॅक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तर आणखी पाच जणांची स्थिती त्याहीपेक्षा नाजूक असल्याने त्यांना बायपॅप मशिनवर ठेवण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत या रुग्णांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. या रुग्णांपैकी काहींच्या प्रकृतीत थोडीबहुत सुधारणा आता दिसू लागली आहे. मागील काही दिवसांत प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत होते. मात्र सध्या त्याला ब्रेक लागला असून हे १२ रुग्णच प्रकृती गंभीर असल्याने आॅक्सिजनवर आहेत.