कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला तीन हजार लग्नांचा बार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:31 AM2021-04-20T04:31:08+5:302021-04-20T04:31:08+5:30
हिंगोली : गतवर्षी कोरोना संसर्ग आजारामुळे अनेकांना लग्नसोहळे पुढे ढकलावे लागले होते. याहीवर्षी कोरोनाचा संसर्ग कायम असला तरी कोरोना ...
हिंगोली : गतवर्षी कोरोना संसर्ग आजारामुळे अनेकांना लग्नसोहळे पुढे ढकलावे लागले होते. याहीवर्षी कोरोनाचा संसर्ग कायम असला तरी कोरोना नियमांचे पालन करीत जवळपास तीन हजार लग्नसोहळे उरकण्यात आले. जिल्ह्यात कोरोना आजाराचा संसर्ग वाढतच चालला आहे. गतवर्षी ऐन लग्नसराईत कोरोनाने पाय पसरले होते. त्यामुळे लग्नतारखा जाहीर झाल्यानंतरही अनेकांना लग्नसोहळे पुढे ढकलावे लागले होते. त्यानंतर मध्यंतरी कोरोना आजाराचे रुग्ण संख्या कमी झाली होती. त्यामुळे पुन्हा लग्नसोहळे आयोजित करण्यात येत होते. मंगलकार्यालये बुकिंग करून ठेवले होतेे. मात्र, त्यानंतर पुन्हा कोरोनाचा उद्रेक सुरू झाला. केवळ ५० नातेवाइकांच्या उपस्थितीत लग्नसोहळे आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली. ५० जणांना परवानगी असली तरी अनेक ठिकाणी शेकडो नातेवाइकांनी लग्न सोहळ्यास उपस्थिती लावली. ग्रामीण भागात तर धुमधडाक्यात लग्न सोहळे आयोजित करण्यात आले. जिल्ह्यात जवळपास तीन हजार लग्नसोहळे पार पडले असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाची नजर चुकवून लग्नसोहळे आयोजित करण्यात आले. याच वेळी कोरोना नियमांचे पालनही करण्याचा प्रयत्न झाला.
१९ जोडप्यांनी केली विवाहाची नोंदणी
हिंगोली येथील सह. दुय्यम निबंधक अधिकारी कार्यालय वर्ग -२ यांच्याकडे वर्षभरात १९ जोडप्यांनी लग्न झाल्याची नोंद केली आहे. हा आकडा कार्यालयापुरता असला तरी प्रत्यक्षात लग्न सोहळ्यांचा आकडा हजारांमध्ये असल्याचे जाणकार सांगत आहेत. विवाह नोंदणी करण्यास ग्रामीण भागात अद्याप उदासीनता दिसून येत आहे.
तीन महिन्यांत ३१ विवाह मुहूर्त
जिल्ह्यात जवळपास तीन हजार विवाह झाले असले तरी अजूनही एप्रिल ते जून या महिन्यात ३१ विवाह मुहूर्त आहेत. यात एप्रिल महिन्यात २२, २४, २५,२६,२८,२९, ३० (७ मुहूर्त) मे महिना : १,२,३,४,५,८,१३,१५,२०,२१,२२,२४, २६, २८,३०, ३१ (१६ मुहूर्त) जून महिना : ४,६,१३,१६,२०,२६,२७,२८ (८ मुहूर्त) असे एकूण ३१ मुहूर्त आहेत.
एप्रिल महिना कठीण
जिल्ह्यात सध्या कोरोना आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काही ठिकाणी लग्न सोहळे आयोजित करण्यात आले आहेत. मात्र, कोरोना आजाराचा संसर्ग लक्षात घेता चांगलीच खबरदारी घ्यावी लागणार आहे.
कोरोना आजाराचा संसर्ग नव्हता तेव्हा मंगलकार्यालयात लग्न सराईत ८० ते ९० लग्न सोहळे होत होते. मात्र, कोरोना आजारामुळे यावर्षी केवळ १ ते २ च लग्नसोहळे मंगलकार्यालयात झाले आहेत. यात मंगलकार्यालय मालकांचे मोठे नुकसान होत आहे.
- निश्चल यंबल, अध्यक्ष, महावीर भवन
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मंगलकार्यालय बंदच ठेवण्यात आले आहे. आलेल्या बुग रद्द कराव्या लागल्या. कोरोना नव्हता तेव्हा दोन महिन्यांपासून अगोदरच तारखा बुकिंग करून ठेवल्या जात होत्या.
- गोकुळ तोष्णीवाल, कळमनुरी