कोरोनामुळे अकाली मृत्यू वाढले; मृत्यूपत्र करणाऱ्यांची संख्याही वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:22 AM2021-06-02T04:22:55+5:302021-06-02T04:22:55+5:30
हिंगोली : जिल्ह्यात कोरोनामुळे अकाली मृत्यू वाढले आहेत. त्यामुळे मृत्यूनंतर कुटुंबात वाद नको म्हणून अनेक जण मृत्यूपत्र करीत आहेत. ...
हिंगोली : जिल्ह्यात कोरोनामुळे अकाली मृत्यू वाढले आहेत. त्यामुळे मृत्यूनंतर कुटुंबात वाद नको म्हणून अनेक जण मृत्यूपत्र करीत आहेत. कोरोनाकाळात २४ जणांनी मृत्यूपत्र तयार केल्याची नोंद हिंगोली येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयाकडे आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग अजूनही कमी झालेला नाही. आतापर्यंत १५ हजार ६८० रुग्ण आढळून आले आहेत. तर आजपर्यंत ३६१ रुग्णांना मृत्यूने गाठले असून, यात कमावत्या व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे कमावत्या व्यक्तींसमोर भीती निर्माण झाली आहे. उपचारादरम्यान अकाली मृत्यू आल्यास कुटुंबात संपत्तीवरून वाद नको, म्हणून अनेक जण मृत्युपत्र तयार करीत आहेत. न्यायालय परिसरात तीन ते चार नोटरी वकील आहेत. या वकिलांकडे मृत्युपत्र तयार करण्यासाठी एकानेही संपर्क साधला नसला तरी येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयाकडे मात्र मागील वर्षी १८ तर चालू वर्षी ६ जणांनी मृत्युपत्र करून घेतले आहे. मृत्युपत्र करणाऱ्यांचे प्रमाण वाढले किंवा कमी झाले, हे सांगता येणार नसल्याचे रजिस्ट्री कार्यालयातूून सांगण्यात आले.
दीड वर्षात अशी झाली नोंदणी
२०२० मध्ये जानेवारी व फेब्रुवारी महिना सोडला तर मार्च ते जून महिन्यापर्यंत एकाही मृत्यूपत्राची नोंद सह दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नाही. त्यानंतर जुलै २, ऑगस्ट १, सप्टेंबर १, ऑक्टोबर ६, नोव्हेंबर १, डिसेंबर महिन्यात एकाने मृत्युपत्र करून घेतले आहे. २०२१ मध्ये जानेवारी १, फेब्रुवारी ३ तर मार्च महिन्यात २ जणांनी मृत्युपत्र करून घेतले आहे. एप्रिल व मे महिन्यात एकाही मृत्युपत्राची नोंद सह दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नाही.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अकाली मृत्यू येत असल्याने मृत्युपत्र करण्याकडे साहजिकच कल वाढत आहे. आपल्यानंतर कुटुंबात वाद नको म्हणून मृत्युपत्र करण्याचा निर्णय घेत असावेत.
- ॲड. शेषराव पतंगे, जिल्हाध्यक्ष, वकील संघ
कोरोनाची प्रत्येकाने धास्ती घेतली आहे. आरोग्याकडे जास्त लक्ष दिले जात असले तरी अकाली मृत्यू येण्याचे प्रमाणही वाढले आहे. येथील नोटरी वकिलाकडे मृत्युपत्र करण्यासंदर्भात विचारणा होत नसली तरी सह दुय्यम निबंधक कार्यालयात मात्र मृत्युपत्र करून घेत आहेत.
-ॲड. जे.पी. खंदारे,
असे आहेत मृत्युपत्र करण्याचे प्रकार
घर, शेती तसेच अन्य संपती कुटुंबातील सदस्यांच्या नावे करण्यासाठी त्याची काही जण वकिलामार्फत नोटरी करतात. तर काही जण साध्या कागदावरही त्याची नोंद करून ठेवतात, तसेच रजिस्टर्ड नोटरी केल्यास त्याचे शुल्क भरून शासन दरबारी त्या मृत्युपत्राची नोंद राहते.