कोरोना परतू लागताच गाव सोडले; कामासाठी पुन्हा मुंबई, पुणे गाठले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:19 AM2021-07-22T04:19:34+5:302021-07-22T04:19:34+5:30
राज्यभरात कामानिमित्त, नोकरीनिमित्त, तसेच शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील मजूर, कामगार, विद्यार्थ्यांचे देशभरात विविध भागांत स्थलांतर झाले होते. मात्र, ...
राज्यभरात कामानिमित्त, नोकरीनिमित्त, तसेच शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील मजूर, कामगार, विद्यार्थ्यांचे देशभरात विविध भागांत स्थलांतर झाले होते. मात्र, कोरोना संसर्ग आजाराने सर्वत्र धुमाकूळ घातला. त्यामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करावे लागले होते. लॉकडाऊन जाहीर होताच स्थलांतर झालेले कामगार, विद्यार्थी, नोकरदार गावाकडे परतले होते. गावाकडे आल्यानंतर अनेकांनी नवीन व्यवसाय थाटले, तर काही जणांनी पुन्हा मोठ्या शहरात जाण्याचे नियोजन केले होते. आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने व्यवहार पुन्हा सुरळीत होत असून, परत स्थलांतर होताना दिसत आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, सुरत, अंदमान, निकोबार आदी भागांत कामगार परतले आहेत. विद्यार्थीही शिक्षणासाठी परत जात असल्याचे दिसत आहे.
५१९ जणांनी काढला पासपोर्ट
परदेशात नोकरी, शिक्षणानिमित्त जाण्यासाठी जिल्ह्यातील ५१९ जणांनी पासपोर्ट काढला आहे. कोरोनापूर्वी बहुतांश जण परदेशात होते. त्यापैकी काहींनी परदेशातच थांबणे पसंत केले होते, तर काही मायदेशी परतले होते. आता कोरोना कमी झाल्याने पुन्हा परदेशात जाण्यासाठी तयारी चालवली आहे.
परदेशात असलेले हिंगोलीकर आपल्या कुटुंबीयांशी फोन, व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत खुशाली कळवत आहेत.
कोरोनाकाळात परदेश, परराज्य, परजिल्ह्यातून आलेले नागरिक
हिंगोली- १०,५१५
वसमत- ८,७७९
कळमनुरी- १२,३८५
सेनगाव- ११,१५२
औंढा- ७,११९
एकूण- ४९,९६०
मुले परदेशात, चिंता भारतात
१) माझा मुलगा नोकरीनिमित्त दुबई येथे आहे. अनेक देशांत कोरोना संसर्ग असल्याने काळजी वाटत होती. मात्र, वर्क फ्रॉम होम काम असल्याचे समजल्याने काळजी मिटली. सतत व्हाॅटस्ॲप व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्याच्या संपर्कात असते. आता कोरोना कमी झाला आहे. त्यामुळे चिंता मिटली आहे.
-मनीषा गजानन मिस्किन, हिंगोली
२) माझा मुलगा बालासाहेब निर्मले हा शिंगणापूर येथील अँग्लो इस्टर्न कंपनीत मरीन चीफ इंजिनिअर आहे. कोरोनाकाळात त्याच्या आरोग्याची काळजी वाटत होती. त्यामुळे व्हॉटस्ॲप कॉलच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क साधत होते. आता कोरोना कमी झाला आहे. त्यामुळे आता काळजी मिटली आहे.
-विजयमाला कुंडलिकराव निर्मले, हिंगोली