कोरोनानंतर बदलले घराघरातील किचन; हेल्दी पदार्थ वाढले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:39 AM2021-06-16T04:39:26+5:302021-06-16T04:39:26+5:30
हिंगोली : कोरोना संसर्गाने मानवी जीवनच ढवळून काढले आहे. प्रत्येक जण आरोग्याची काळजी घेत असून, हेल्दी पदार्थ खाण्याकडे कल ...
हिंगोली : कोरोना संसर्गाने मानवी जीवनच ढवळून काढले आहे. प्रत्येक जण आरोग्याची काळजी घेत असून, हेल्दी पदार्थ खाण्याकडे कल वाढला आहे, त्यामुळे स्वयंपाक घरातील दररोजच्या मेनूतही बदल होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
जिल्ह्यात कोरोनाने सर्वत्र थैमान घातले होते. जवळपास १५ हजार ८८१ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभाग, प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्याने यातील तब्बल १५ हजार ४१८ रुग्ण बरे करण्यात यश आले आहे. मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत असल्याने प्रत्येक जण आपल्या आरोग्याची काळजी घेत आहे. फास्ट फुड ऐवजी हेल्दी पदार्थ खाण्याकडे सर्वांचा कल वाढला आहे. कोरोनानंतर तर प्रत्येक घरातील किचनमधील मेनू बदलले आहेत. प्रामुख्याने जेवणात रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या पदार्थांचा समावेश केला जात आहे. आठवड्यातून कधीतरी पालेभाज्या खाणाऱ्या घरीही आता नियमित पालेभाज्या आहारात घेतल्या जात आहेत. दुग्धजन्य पदार्थांचेही नियमित सेवन केले जात असल्याचे महिलांमधून सांगण्यात आले.
कच्चा भाज्या, कडधान्ये...
-रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याकडे सर्वच जण लक्ष देत आहेत. सकाळी मोड आलेले कडधान्य तसेच जेवणासोबत काकडी, टोमॅटो, गाजर, बीटरूट, कोबी, मेथीची भाजी आदी भाज्या घेतल्या जात आहेत. त्यामुळे बहुतांश महिला स्वयंपाकघरात भाज्या व मोड आलेले कडधान्य ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी राेजच्या जेवणात हे हवेच
सकाळी गुळवेलाचा काढा, मोड आलेले कडधान्य घेतलेले चांगले असते, तसेच सकाळच्या जेवणात वरण-भात, पोळी भाजी, लिंबू किंवा दही असावे.
दुपारी कोणतेही एखादे फळ खावे. त्यानंतर साडेचारच्या सुमारास गुळासोबत, शेंगदाणे, वाटाणे किंवा थोडेसे फुटाणे घ्यावेत.
सायंकाळच्या जेवणात वरण-भात, पोळी, भाजी असावी, तसेच रात्री हळदीचा काढा घेतल्यास उत्तम. मांसाहार करणाऱ्यांनी आठवड्यातून एक किंवा दोन दिवस चिकन, मटन, मच्छी यांपैकी कोणताही मांसाहार घेतल्यास शरीरासाठी फायदेशीर ठरते.
- सुप्रिया इंगोले, आहार तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, हिंगोली.
फास्ट फुडवर अघोषित बंदी
कोरोनामुळे आता पोष्टीक पदार्थ दररोजच्या खाण्यात घेतले जात आहेत. त्यामुळे फास्ट फूड खाण्याकडे दुर्लक्ष होत आहे. तळलेले पदार्थ, केक, आईस्क्रीम, चिप्स आदी ऐवजी हिरव्या पालेभाज्या, गाजर, बीटरूट आदींचा आहारात समावेश केला जात आहे.
गृहिणी म्हणतात...
कोरोनामुळे दररोजच्या आहारात बदल झाला असून, आता फास्ट फूड ऐवजी घरीच बनविलेल्या जेवणाला पसंती दिली जात आहे. जेवणाच्या वेळाही पाळल्या जात आहेत. हिरव्या पालेभाज्यांचाही समावेश आहारात होत आहे.
- पूजा सुमित चौधरी
कोरोनामुळे आता आरोग्याची खूपच काळजी घेतली जात आहे. आहारातही हेल्दी पदार्थ वाढले आहेत. त्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होत आहे. मागील काही दिवसांपासून फास्ट फूड खाणे बंद केले आहे.
- श्रृती मयूर कयाल
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहारात पौष्टिक अन्न पदार्थांचा समावेश वाढला आहे. हिरव्या पालेभाज्यासह मोड आलेले कडधान्यही नियमित सेवन केले जात आहे.
-सरिता अनिल नेणवाणी.