कोरोना, डेंग्यूची लक्षणे वेगळी; तातडीने करून घ्या इलाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:19 AM2021-07-24T04:19:04+5:302021-07-24T04:19:04+5:30
हिंगोली : कोरोना महामारी ओसरत चालली असली तरी, रुग्ण आढळून येत असल्यामुळे अजूनही नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असा सल्ला आरोग्य ...
हिंगोली : कोरोना महामारी ओसरत चालली असली तरी, रुग्ण आढळून येत असल्यामुळे अजूनही नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. दुसरीकडे कोरोना आजार कोरोना विषाणूमुळे होतो, तर डेंग्यू डास चावल्यामुळे होतो, हेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
पावसाळा सुरू होऊन दीड-दोन महिने झाले आहेत. तेव्हा नागरिकांनी आपले अंगण व आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे प्रत्येकाचे काम आहे. अस्वच्छतेमुळे परिसरात डासांची संख्या वाढते. या डासामुळेच डेंग्यू आजार उत्पन्न होतो. एकदा डास चावला की ताप येणे सुरू होते. तसेच इतर व्याधींना सामोरे जावे लागते.
पावसाळ्यात आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा, असे आवाहन आरोग्य विभाग वारंवार करते. परंतु काही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना डेंग्यूसारख्या आजाराला सामोरे जावे लागते, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन गावोगावी औषध फवारणी करून घेण्यात येत आहे.
२०१९ मध्ये १४० रक्त नमुने घतले, त्यात ५ दूषित, २०२० मध्ये ४८ रक्त नमुने घेतले, त्यात २ दूषित, तर २०२१ (जुलैपर्यंत) १६ जणांचे रक्त नमुने तपासले, परंतु रुग्ण मात्र आढळला नाही, असे आरोग्य विभागाने सांगितले.
डेंग्यूचे रूग्ण...
२०१९ - ०५
२०२० - ०२
२०२१ (जुलैपर्यंत) ००
चाचणी कुठली...
कोरोना आजार हा विषाणूमुळे होतो. कोरोनासाठी आरटीपीसीआर आणि अँटिजन तपासणी करणे आवश्यक आहे. याचबरोबर मास्क घालणे, सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे आणि सामाजिक अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे नागरिका़ंनी पालन करणे आवश्यक आहे.
डेंग्यूसाठी चाचण्यांची गरज नसली तरी, रक्त नमुने देणे आवश्यक आहे. आजार वेगळे असले तरी जागोजागी स्वच्छता ठेवणे दोन्हीसाठी महत्त्वाचे आहे. काळजी घेतल्यास कोणताच आजार जवळ येत नाही.
प्राथमिक लक्षणे सारखीच....
सर्दी, खोकला आणि ताप ही प्राथमिक लक्षणे जवळपास सारखीच आहेत. फरक एवढाच, करोना विषाणूमुळे होतो, तर डेंग्यू डासामुळे होतो. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी उकळून पिणे दोन्ही आजारांसाठी चांगलेच आहे.
रोज पाणी उकळून प्या, डासापासून सावध राहा....
पावसाळ्यात शहर असो वा ग्रामीण भाग, नळाला पाणी दूषित येते. त्यामुळे नागरिकांनी पाणी रोजच्या रोज उकळून प्यावे. वातावरणातील दूषितपणा लक्षात घेऊन घरातील सर्व सदस्यांना उकळलेले पाणी पिण्यास द्यावे. पावसाळ्यात बाहेरचे उघड्यावरील कोणतेही अन्नपदार्थ नागरिकांनी खाऊ नयेत. या उघड्या पदार्थांवर माशा बसतात. तसेच इतर जीवजंतू बसून उघड्यावरील अन्नपदार्थ खराब करतात.
कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता अँटिजन व आटीपीसीआर चाचणी नागरिकांनी न विसरता करून घ्यावी. दुसरीकडे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी उकळूनच प्यावे. आजार वेगळे असले तरी, लक्षणे जवळपास सारखीच आहेत. तेव्हा स्वत:ची व इतरांची काळजी घ्यावी. लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. गणेश जोगदंड, जिल्हा हिवताप अधिकारी