सर्व आस्थापनांना दरमहा कोरोना चाचणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:21 AM2021-06-26T04:21:32+5:302021-06-26T04:21:32+5:30

हिंगोली : राज्यातील ज्या सात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यात हिंगोलीचा समावेश झाला आहे. कमी प्रमाणात होणाऱ्या चाचण्यांमुळे ...

Corona testing is mandatory for all establishments every month | सर्व आस्थापनांना दरमहा कोरोना चाचणी बंधनकारक

सर्व आस्थापनांना दरमहा कोरोना चाचणी बंधनकारक

Next

हिंगोली : राज्यातील ज्या सात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यात हिंगोलीचा समावेश झाला आहे. कमी प्रमाणात होणाऱ्या चाचण्यांमुळे हा प्रकार घडल्याने सर्व शासकीय, खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक घटकाने दरमहा अँटिजन व आरटीपीसीआर चाचणी करणे बंधकारक करण्याची सूचना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार, उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, अतुल चोरमारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार आदींची उपस्थिती होती.

सूर्यवंशी म्हणाले, राज्यात कोरोनाची दुसरी लाट पूर्णत्वाने ओसरलेली नाही. तसेच तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यात कोरोनाचा नवा विषाणू दिसून आला आहे. त्याची घातकता, परिणामकारकता आज आपल्याला माहिती नाही; पण संभाव्य धोका लक्षात घेऊन आता आपल्या हातात जो वेळ आहे त्या कालावधीत योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. राज्यातील संवेदनशील सात जिल्ह्यांत हिंगोली आहे. दररोज केवळ २०० ते २५० तपासण्या होत असल्याने कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट कमी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे; परंतु ही बाब आपल्या जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा प्रादुर्भाव वाढल्यास पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. हे संकट टाळायचे असेल तर प्रत्येकाने आपली तपासणी करून लसीकरण करून घ्यावे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि आयसोलेशन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, सर्व व्यापारी व आस्थापना मालक/दुकानदार व त्यांच्या आस्थापनेवर काम करणारे सर्व कर्मचारी यांनी येणाऱ्या ३ दिवसांत आरोग्‍य विभागामार्फत लावण्यात आलेल्या कॅम्पवर जाऊन अँटिजन व आरटीपीसीआर तपासणी करून घ्याव्यात तसेच याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. या आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग प्रतिबंध कायदा १८९७, भारतीय दंडसंहिता कलम १८८ नुसार कार्यवाही केली जाईल, असा इशाराही दिला. जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली आहे; परंतु जिल्ह्याला लस उपलब्ध असूनही हवा तसा प्रतिसाद मिळत नाही; तसेच १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू झाले असून लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Corona testing is mandatory for all establishments every month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.