corona virus : आजार दडवू नका ! वेळेवर उपचार न घेतल्याने कोरोनाबाधिताचा रुग्णालयाच्या दारातच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 05:32 PM2021-04-30T17:32:15+5:302021-04-30T17:38:50+5:30
corona virus : मृत्यूनंतर करण्यात आलेल्या चाचणीत रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.
सेनगाव: श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घडली. मृत्यूनंतर केलेल्या चाचणीत वृद्धाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ग्रामीण भागात वेळेवर चाचणी करून उपचार न घेतल्याने गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढत असून मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याचे चित्र आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील ब्रम्हवाडी येथील एका ६० वर्षीय वृद्धास श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, रुग्णालयाच्या दारात येताच रुग्णवाहिकेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृताची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तसेच त्यांच्यासोबत आलेले नातेवाईक सुद्धा पॉझिटिव्ह आले आहेत. मृतावर नगरपंचायतीच्यावतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तहसीलदार कांबळे, मुख्याधिकारी फडसे हे उपस्थित होते.
लक्षणे दिसताच उपचार घ्या
सेनगाव तालुक्यात सध्या ८० कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. तर गंभीर रुग्णांवर हिंगोली येथे उपचार देण्यात येतात. गुरुवारी तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला तर आज दुपारपर्यंत दोन रुग्णांचा उपचार झाला आहे. दरम्यान, ग्रामीण भागात आजार दडवून ठेवण्याचे प्रकार वाढत आहेत. यामुळे गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. लक्षणे दिसताच चाचणी करून वेळेवर उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.