corona virus : पुणे, दुबईतून आलेले दोन प्रवासी हिंगोली जिल्हा रूग्णालयात उपचाराखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 04:48 PM2020-03-14T16:48:31+5:302020-03-14T16:50:27+5:30
यावेळी या दोघांमध्येही कोरोनासी साम्य असलेली काही लक्षणे आढळुन आली.
हिंगोली : कारोनाची काही लक्षणे आढळलेल्या दोन इसमांवर हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. एक पुणे येथून तर दुसरा दुबई मार्गे दोघेही ट्रव्हल्सने हिंगोलीत १४ मार्चला सकाळी आले होते. दोघांनाही सुरक्षीततेच्या दृष्टिकोनातून उपचारखाली ठेवले असून ते फिजिशिएनच्या देखरेखीत आहेत. तज्ज्ञामार्फत दोघांचेही रिपोर्ट पुणे येथे पाठविले जातील. व दोघांचेही रिपोर्ट आल्यानंतरच दोघे प्रवासी कोरोनाग्रस्त आहेत किंवा नाही हे स्पष्ट होईल असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यात कोरानाचा अद्याप एकही रूग्ण आढळुन आलेला नाही. प्रशासनाकडून खबरदारी म्हणून सर्व उपाय-योजना व जनजागृती केली जात आहे. परंतु १४ मार्च रोजी हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयात दोन संशयीतावर उपचार सुरू आहेत. केवळ संशयीत म्हणून या दोघांना उपचाराखाली ठेवण्यात आले आहे. सविस्तर माहिती अशी की, हिंगोली शहरात दोघे प्रवासी ट्रॅव्हल्सने आल्यानंतर त्यांना कोरोनासी साम्य असलेली काही लक्षणे असल्याचे त्यांना जाणवले. त्यानंतर दोघेही हिंगोली शहरातील एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी गेले होते. यावेळी संबंधित डॉक्टराने प्रथम तपासणी केली असता यावेळी या दोघांमध्येही कोरोनासी साम्य असलेली काही लक्षणे आढळुन आली.
याबाबत डॉक्टरांनी जिल्हा शल्य चिकीत्सक किशोरप्रसाद श्रीवास यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर या दोघांनाही सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून जिल्हा रूग्णालयातील ‘आयसोलेशन वार्ड’ येथे प्रशिक्षीत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार उपचाराखाली ठेवण्यात आले आहे. दोघेही कोरोनाग्रस्त नाहीत, केवळ ते दोघे पुणे व दुबई येथून हिंगोलीत आल्याने सुरक्षीततेच्या दृष्टिकोनातून खबदारी म्हणून त्यांना उपचाराखाली ठेवले आहे. असे जिल्हा शल्य चिकित्सक श्रीवास यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. दोघांचेही रिपोर्ट सोमवारी सायंकाळपर्यंत जिल्हा रूग्णालयास मिळतील. तोपर्यंत हे दोघेही प्रवासी उपचाराखालीच राहणार आहेत.