coronavirus : हिंगोली जिल्ह्यात १४ नव्या रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 10:58 PM2020-07-08T22:58:00+5:302020-07-08T22:58:39+5:30
हिंगोली जिल्ह्यातील सर्व कोरोना केअर सेंटरमध्ये आतापर्यंत ५४३६ जणांना भरती केले होते.
हिंगोली : जिल्ह्यात पुन्हा १४ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत आढळलेल्यांची संख्या ३१४ वर पोहोचली आहे. तर २६३ जण बरे झाल्याने घरी सोडले असून ५१ जणांवर उपचार सुरू आहेत.
आज नव्याने आढळलेल्यांत हिंगोली तालुक्यातील पेडगाव येथील एका वृद्धाचा समावेश आहे. सारीच्या आजाराने हा रुग्ण भरती होता. यासाठी बाहेर उपचारार्थही गेला होता. तर हिंगोलीतील तलाबकट्टा भागातील एका ३२ वर्षीय महिलेसह तिच्या एक वर्षाच्या मुलाला कोरोनाची बाधा झाली आहे. हे दोन्ही रुग्ण नांदेड येथे भरती असलेल्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातील आहेत. त्यांना अंधारवाडी क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले होते. याशिवाय औंढा तालुक्यातील दौंडगाव येथील एक २५ वर्षीय महिला प्रसूतीपश्चात पॉझिटिव्ह आली असून तिच्यासमवेतच्या ५0 वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे. हे दोन्ही रुग्ण औरंगाबाद येथून आल्यामुळे औंढा येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये होते.
लिंबाळा क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती असलेल्या तब्बल सहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यात हिंगोली तालुक्यातील हनवतखेडा येथील १८ वर्षीय युवक, भांडेगाव येथील २६ वर्षीय युवक हे दोनजण मुंबईहून परतलेले होते. तर औरंगाबादहून आलेल्या कळमकोंडा येथील एका ३७ वर्षीय पुरुषासह १६ व १२ वर्षांची मुले व १४ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. तर कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे ठाणे येथून परतलेल्या कुटुंबातील २ महिन्यांच्या मुलीला कोरोनाची बाधा झाली आहे. ते कळमनुरीत क्वारंटाईन आहेत. सेनगाव क्वारंटाईनमध्ये असलेल्या वैतागवाडी येथील बापलेकालाही कोरोनाची बाधा झाली.
आज एकूण १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील सर्व कोरोना केअर सेंटरमध्ये आतापर्यंत ५४३६ जणांना भरती केले होते. यापैकी ४९0४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ४६२२ जणांना डिस्चार्ज दिला आहे. सध्या ८0३ जण विविध क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती आहेत. तर २४९ जणांचे थ्रोट स्वॅब घेणे अथवा त्याचा अहवाल येणे प्रलंबित आहे.