coronavirus : हिंगोलीत आणखी २८ कोरोनाबाधितांची वाढ; ६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 01:34 PM2020-07-14T13:34:08+5:302020-07-14T13:34:34+5:30
जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ३६१ वर पोहोचली आहे.
हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचे नवे २८ रुग्ण आढळले असून आता एकूण रुग्णसंख्या ३६१ वर पोहोचली आहे. यातील २८७ रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. सध्या ७४ जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी एकूण ६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
आज नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये पेन्शनपुरा भागातील एका ४१ वर्षीय इसमाचा समावेश असून तो सारीच्या आजाराने त्रस्त आहे. तो बाहेरून आल्याचा पूर्वइतिहास नाही. औंढा तालुक्यातील अंजनवाडी येथील ३२ वर्षीय पुरुष व सेनगाव येथील २५ वर्षीय पुरुष या दोन सारीच्या रुग्णांसही पूर्वइतिहास नसून सारीच्या आजाराने भरती झाल्यानंतर कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. हिंगोली तालुक्यातील पेडगाव येथील कोविड रुग्णाच्या संपर्कातील ११ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यात ३५ वर्षीय, ३0 वर्षीय, ५५ वषींय, २२ वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय, २५ वर्षीय, ३0 वर्षीय, २२ वर्षीय, ५५ वर्षीय स्त्री तर ११ वर्षांचा मुलगा व ६ वर्षांची मुलगी अशा ११ जणांचा समावेश आहे.
वसमत येथील सम्राट कॉलनीतील तिघेही कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने बाधित झाले आहेत. यात १२, १५ व ६ वर्षीय अशा तीन मुलांचा समावेश आहे. याशिवाय स्टेशनरोड, वसमत येथील एका ११ वर्षीय मुलीला कोविड रुग्णाच्या संपर्कात आल्याने बाधा झाली. वसमतच्या गणेशपेठ भागात २६ वर्षीय पुरुष पुण्याहून परतला असून बाधित आढळला. हिंगोली तालुक्यातील रामा देऊळगाव येथे मुंबईहून परतलेल्या चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. ३0 व २५ वर्षीय दोन स्त्रीयांसह १३ वर्षांची मुलगी, ११ वर्षांचा मुलगा यांचा समावेश आहे. याच गावची पुण्याहून परतलेली २४ वर्षीय महिलाही कोरोनाबाधित आढळली आहे. तर हिंगोली तालुक्यातील पहेनी येथील २२ व ४८ वर्षीय अशा दोन महिलांना कोरोनाची लागण झाली असून त्या औरंगाबादहून परतल्या होत्या. हिंगोली तालुक्यातील माळधामणीत मुंबईहून परतलेल्या २९ वर्षीय पुरुषाला तर जयपूरवाडीत सूरतहून परतलेल्या ४५ वर्षीय महिलेलाही कोरोनाची बाधा झाल्याचे आज आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
हिंगोली येथील ४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आॅक्सिजन लावण्याची वेळ आली आहे. तर २ अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. एकूण ६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.