CoronaVirus : उपासमारीची वेळ आल्याने जालन्यातून ३३ मजूर रातोरात गेले मध्यप्रदेशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 06:07 PM2020-04-04T18:07:13+5:302020-04-04T18:10:28+5:30
बदनापूर तालुक्यातील महामार्गाच्या कामावर होते मजुरीवर
- दिलीप सारडा
बदनापूर : तालुक्यातील केळीगव्हाण शिवारातील केळीगव्हाण- समृद्धी महामार्गाच्या कामावर असलेले मध्य प्रदेशातील ३३ मजूर आपल्या मुलाबाळांसह रातोरात मध्यप्रदेशात गेल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत संबंधित विभागासही थांगपत्ता लागलेला नाही.
तालुक्यातील केळीगव्हाण शिवारात पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेअंतर्गत साडेपाच किलोमीटरचे काम सुरू आहे. हे काम केळीगव्हाण ते समृध्दी महामार्ग व पठार देऊळगाव ते बावणे पांगरी या दोन टप्प्यांमध्ये आहे. यापैकी पठार देऊळगाव ते बावणे पांगरी हा टप्पा जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, केळीगव्हाण ते समृध्दी महामार्ग या टप्प्यातील रस्त्याचे काम सुरू आहे. या कामाकरीता मध्यप्रदेशातील एकूण ३३ मजुरांना येथे आणण्यात आले होते. यामध्ये (बनहुर, जि. खरगोन धुलकोट, जि. बुरहानपूर, मध्यप्रदेश) अशा विविध गावातील महिला व पुरूषांचा समावेश होता.
पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर सर्वत्र ‘लॉकडाऊन’ झाल्यानंतर कुणीही अन्न- पाण्यावाचून राहणार नाही. याची दक्षता घेण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. परंतु, या कामावरील मजुरांकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे या मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. परंतु, त्यांनी केळीगव्हाण येथे जावून अन्नपाणी देण्याची मागणी केली. त्यानंतर तेथील पोलीस पाटील व ग्रामस्थांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. या मजुरांविषयी प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर बदनापूरच्या तहसीलदार छाया पवार यांनी मजुरांची भेट घेतली. त्यांना एक गोणी तांदूळ व एक गोणी गव्हाचे वाटप केले होते. तसेच ग्रामस्थांनीही मिठ- मिरची, तेल, हळद अशा वस्तू या मजुरांना दिल्या होत्या.
शुक्रवारी सगळे मजूर गायब
गुरूवारपर्यंत या कामाच्या ठिकाणी हे सर्व मजूर उपस्थित होते. परंतु, शुक्रवारी सकाळी या ठिकाणी हे मजूर व त्यांचे सामान नसल्याचे ग्रामस्थांना दिसले. पोलीस पाटील रामेश्वर मदन म्हणाले, हे मजूर गुरूवारपर्यंत मी स्वत: बघीतले होते. शुक्रवारी सकाळी मी तेथे गेलो असता तेथे मध्य प्रदेशातुन आलेले एकही मजूर नसून, त्यांचे साहित्यही नव्हते. हे मजूर रात्री एखाद्या वाहनाने येथून गेल्याचे दिसत आहे.
संबंधित विभागाला खबरच नाही
अभियंता सुदाम शिंदे म्हणाले, मी ‘लॉकडाऊन’च्या काळात या मजुरांना अन्नधान्य पुरविण्यासंदर्भात संबंधित गुत्तेदाराला सूचना केली होती. गुरूवारपर्यंत मजूर तेथेच होते. शुक्रवारी हे मजूर गेल्याची मला माहिती नाही.
मजूर गावी पोहनचले
मी शुक्रवारी मजुरांविषयी संबंधित गुत्तेदाराशी संपर्क साधला. त्यांनी हे मजूर आपापल्या गावी गेल्याचे सांगितले. या मजुरांपैकी एका महिलेसोबत माझे मोबाईलवरून बोलणे झाले असून, त्या महिलेने आम्ही आमच्या गावी पोहचल्याचे मला सांगितले आहे.
- छाया पवार, तहसीलदार