CoronaVirus : हिंगोलीकरांना मोठा दिलासा; १४ दिवसांच्या उपचारानंतर 'त्या' रुग्णाचा पहिला अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 09:16 PM2020-04-15T21:16:57+5:302020-04-15T21:18:41+5:30
आणखी एक चाचणी घेणे बाकी असून ती निगेटिव्ह आल्यानंतरच या रुग्णाबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
हिंगोली : वसमत येथील पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णाचा १४ दिवसांच्या उपचारानंतर घेतलेला १४ एप्रिल रोजीचा थ्रोट स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला असल्याने जिल्ह्याने सुटकेचा निश्वास सोडला आहे. आता जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र आणखी एक चाचणी घेणे बाकी असून ती निगेटिव्ह आल्यानंतरच या रुग्णाबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात २ एप्रिल रोजी हा ४९ वर्षीय इसम कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले होते. त्यापूर्वी दोन दिवस अगोदर तो वार्डात दाखल झालेला होता. त्याचा पहिला थ्रोट स्वॅब अहवाल आज निगेटिव्ह आला आहे. मात्र केंद्रिय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार २४ तासांच्या अंतरातील दोन थ्रोट स्वॅब अहवाल निगेटिव्ह येणे गरजेचे आहे. आता पहिला अहवाल निगेटिव्ह आल्याने जीव भांड्यात पडला आहे.
तर सारिने त्रस्त असलेल्या ७0 वर्षांच्या महिलेचाही थ्रोट स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला आहे. वसमत येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल झालेल्या अन्य दोघांचे थ्रोट स्वॅब नमुने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी एकजण हैदराबाद येथून परतलेला आहे. तर तर दुसरा व्यवसायाने ट्रक चालक असून गुजरात राज्याच्या सीमेवरून वसमत येथे आलेला आहे.