CoronaVirus In Hingoli : कोरोनाग्रस्ताच्या जवळच्या संपर्कातील ८ संशयित रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 07:22 PM2020-04-03T19:22:29+5:302020-04-03T19:23:26+5:30
कुटुंबाच्या सदस्यांसह इतरांचा समावेश
हिंगोली : वसमत येथील ज्या रुग्णाचा कोरोना संसर्गाचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्याच्या संपर्कातील ८ जणांना संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून या सर्वांचे थ्रोट स्वॅब नमुने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेला पाठविले. तर काल दाखल झालेल्या इतर चारही जणांच्या थ्रोट स्वॅब नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
वसमत येथील एकाचा कोरोना संसर्गाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्हा हादरला आहे. तर प्रशासनाने खबरदारी म्हणून या रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांसह संपर्कात आलेल्यांना जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल केले आहे. अशांची संख्या ८ आहे. या सर्वांचे थ्रोट स्वॅब नमुने घेतले असून औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
काल दाखल झालेल्या इतर चार जणांच्या थ्रोट स्वॅब नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यात एका ११ वर्षीय मुलीचा समावेश होता. शिवाय कझाकिस्तानमधून आलेल्या एकासह त्याच्या भावालाही दाखल केले होते. तर अन्य एक कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील व्यक्ती होती. या चारही जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सुटकेचा निश्वास सोडला असतानाच कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील नवीन आठ जण दाखल केल्याने त्यांच्या अहवालाची चिंता आहे.
वसमतमध्ये होणार सर्व्हेक्षण
कोरोना रुग्ण आढळून आल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या आदेशान्वये वसमतमध्ये कंटेनमेंट आणि बफर झोनची कार्यवाही सुरू झाली आहे. कंटेनमेंट झोनमध्ये तो व्यक्ती राहात असलेल्या आजूबाजूचा तीन किमीपर्यंतच्या परिसरात एएनएम, एमपीडब्ल्यू, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत सर्व्हेक्षण केले जाईल. हा व्यक्ती कोणाच्या संपर्कात आल्यास माहिती घेतली जाणार आहे. यासाठी प्रतिपथक ५0 घरे रोज सकाळी १0 ते दुपारी २ या काळात सर्व्हेक्षण होणार आहे. यात कोणी जवळच्या संपर्कातील व्यक्ती आढळल्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करून थ्रोट स्वॅब घेतले जाणार आहे. याशिवाय या भागात कुणाला फ्लूसारखी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय अधिकाºयांच्या सल्ल्याने औषधोपचार केले जाणार आहे. तर सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, दम लागणे अशी लक्षणे आढळल्यास अशांना जिल्हा रुग्णालयाकडे संदर्भित केले जाणार आहे. बफर झोनमध्ये कंटेनमेंट झोनच्या शेजारील पाच किमी परिघातील भाग. या भागातील नागरिकांनी आरोग्यविषयक काही समस्या असल्यास उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे संपर्क साधून औषधोपचार घेणे. यासाठी २१ पथके व पर्यवेक्षकिय वैद्यकीय अधिकारी नेमले आहेत.