CoronaVirus : हिंगोलीकरांची चिंता वाढली; परभणीच्या पॉझिटिव्ह रुग्णासोबत होते पुसेगावचे दोघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 06:22 PM2020-04-16T18:22:40+5:302020-04-16T18:27:27+5:30

पुसेगाव येथील दोन जण आल्याचे सांगितले जात असले तरीही गावात तसे कोणी नवीन आल्याचे आढळून येत नसल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.

CoronaVirus: Hingoli citizens worries rise; two Pusegaon people were with Parbhani's positive patient | CoronaVirus : हिंगोलीकरांची चिंता वाढली; परभणीच्या पॉझिटिव्ह रुग्णासोबत होते पुसेगावचे दोघे

CoronaVirus : हिंगोलीकरांची चिंता वाढली; परभणीच्या पॉझिटिव्ह रुग्णासोबत होते पुसेगावचे दोघे

Next
ठळक मुद्देपरभणीत कोरोनाचा शिरकाव,पुण्याहून आलेला चालक पॉझिटिव्हपुण्याहून आलेल्या चॉकसोबत हिंगोलीचे होते दोघे

हिंगोली/ पुसेगाव : परभणी येथील एमआयडीसीत आढळलेल्या एका पॉझिटिव्ह रुग्णासोबत पुण्याहून येताना दुचाकीवर हिंगोली जिल्ह्यातील पुसेगाव येथील दोन जण आल्याचे सांगितले जात असले तरीही गावात तसे कोणी नवीन आल्याचे आढळून येत नसल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. आता पूर्ण तालुकाच पिंजून काढण्याची वेळ प्रशासनावर येते की काय? हा प्रश्न आहे.

परभणी येथे काही दिवसांपूर्वी पुण्याहून आलेल्या व कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या या तरुणासोबत हिंगोली जिल्ह्यातीलही दोघेजण आल्याचे त्याने सांगितले आहे. तशी माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर त्यांनी सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे पोलीस फौजफाटा आणि आरोग्य विभागाचे कर्मचारीही पाठविले. या गावात ८ एप्रिलला औरंगाबादहून शेवटचा नवीन माणूस दाखल झाला तर एकूण १७१ जण परजिल्ह्यातून आले. त्यानंतर कोणीच आले नाही. त्यामुळे १0 ते १४ एप्रिलदरम्यान आलेल्याचा शोध सुरू केला आहे. गावात घरोघर जावून आशा, अंगणवाडी मदतनिस व इतरांमार्फत चौकशी केली. मात्र नवीन कुणी दाखल झाल्याचे समोर येत नसल्याने प्रशासन बुचकळ्यात पडले. एवढेच काय तर शेतातही अनेकजण वास्तव्याला गेलेले असल्याने तेथेही चौकशी केली जात आहे. 

प्रत्येक धार्मिक स्थळाच्या ध्वनीक्षेपकावरून उद्घोषणाही दिली. गावात अ‍ॅम्ब्युलन्स, पोलीस फौजफाटा, आरोग्य विभागाचे अधिकारी दाखल झाल्याने पुसेगावकरही सतर्क झाले असून पोलीस व आरोग्य विभागानेही नवीन कोणी आलेले असल्यास तत्काळ कळविण्याचे आवाहन केले. त्यामुळे ग्रामस्थांनीही चाचपणी सुरू केली. मात्र कोणीच आढळून आले नाही. तहसीलदार जीवककुमार कांबळे, बीडीओ बेले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सतीश रुणवाल गावात तळ ठोकून होते. त्याचबरोबर कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर कनेक्शनही असल्याचे सांगितले जात होते. मात्र परभणीच्या पॉझिटिव्ह तरुणाच्या बाळापूर परिसरातील रहिवासी नातेवाईकांची आरोग्य तपासणी तेवढी करण्यात आली. त्यांना कोणतीच लक्षणे नसल्याने होम क्वारंटाईनचा सल्ला दिला.

याबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना विचारले असता ते म्हणाले, पुसेगावची माहिती संबंधित रुग्णाने दिली. गावभर चाचपणी केली. मात्र अजून ठोस काही समोर आले नाही. कदाचित परिसरातील एखाद्या गावातील लोक असतील. त्यादृष्टिने आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण केले जाईल, असे ते म्हणाले.

Web Title: CoronaVirus: Hingoli citizens worries rise; two Pusegaon people were with Parbhani's positive patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.