coronavirus : हिंगोली जिल्ह्यात पुन्हा आठ रूग्णांची भर, एकूण रूग्णसंख्या २४८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 12:38 PM2020-06-23T12:38:08+5:302020-06-23T12:38:38+5:30
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाची एकूण रूग्णसंख्या २४८ वर पोहचली आहे.
हिंगोली : सोमवारी रात्री उशिराने प्राप्त झालेल्या अहवालानुसार ८ नवीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वसमत आणि कळमनुरी येथील बाधितांचा यात समावेश आहे.
क्वॉरंटाईन सेंटर वसमत अंतर्गत चंदगव्हाण गावातील एका ३८ वर्षीय पुरूषाला कोरोनाची लागण झाली आहे. सदरील व्यक्ती ही औरंगाबाद शहरामधून गावात परतली आहे. क्वॉरंटाईन सेंटर कळमनुरी अंतर्गत ७ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ५ व्यक्ती कवडा गावातील असून सर्व पुरूष आहेत. हे सर्वजन मुंबई येथून गावाकडे परतले आहेत. तर २ जण गुंडलवाडी गावातील रहिवासी असून दोघेही किशोरवयीन मुले आहेत. या मुलांचा परिवार ठाणे येथून गावी परतला असून हे सर्वजण आल्यापासून क्वॉरंटाईन सेंटरमध्ये भरती आहेत.
त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यात कोरोनाची एकूण रूग्णसंख्या २४८ वर पोहचली आहे. त्यापैकी २२३ रूग्ण बरे झाले असून २५ रूग्णांवर उपचार सरू आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.