CoronaVirus : हिंगोलीकरांना पुन्हा धक्का : रात्री २२, सकाळी १४ कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ९० वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 12:25 PM2020-05-05T12:25:20+5:302020-05-05T12:26:25+5:30
हिंगोलीतील रिसाला बाजार भागात राहणाऱ्या एका परिचारिकेला कोरोनाची बाधा झाल्याने हा परिसर आता कंटेंटमेंट झोनमध्ये रुपांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे
हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. काल रात्री एसआरपीएफचे २२ जवान व एका परिचारिकेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज सकाळी पुन्हा १४ जवानांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ९0 वर पोहोचली आहे.
हिंगोली येथील एसआरपीएफचे १९२ जवान नाशिक जिल्ह्यातील मालेगाव व मुंबईत सेवा बजावून परतले आहेत. कालपर्यंत यापैकी ६८ जवान पॉझिटिव्ह आले होते. त्यात आता पुन्हा १४ जवानांची भर पडली आहे. त्यामुळे हिंगोलीच्या बाधित जवानांची एकूण संख्या ८२ एवढी झाली आहे. तर कोरोना कक्षात सेवा बजावणाऱ्या एका परिचारिकेलाही लागण झाली आहे. याशिवाय हिवरा बेल येथे जालना येथील एक एसआरपी जवान, त्याच्या संपर्कातील इतर दोघे, वसमत येथील युवक, जांभरुण रोडगे येथील बालक व त्याच्या संपर्कातील एकजणही रुग्ण आहे. कालपर्यंतची कोरोनाची रुग्णसंख्या ७६ होती. आता ती ९0 वर पोहोचली. यापैकी एकजण कोरोनामुक्त झाल्याने त्याला घरी सोडले आहे. तर ८९ जण उपचार घेत आहेत.
आज नव्याने १४ रुग्ण आढळल्याने आता रुग्णसंख्या ९0 वर जावून पोहोचली आहे. आतापर्यंत बाधित आढळलेल्यांपैकी ३५ जवान हे मालेगाव येथे सेवा बजावलेले असून उर्वरित मुंबईतून सेवा बजावून आलेले आहेत.
रिसाल्यात कंटेंटमेंट झोन
हिंगोलीतील रिसाला बाजार भागात राहणाऱ्या एका परिचारिकेला कोरोनाची बाधा झाल्याने हा परिसर आता कंटेंटमेंट झोनमध्ये रुपांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या हा परिसर सील केला जात आहे.
आधी क्वारंटाईनकडे दुर्लक्ष
कोरोना रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर व परिचारिकांना त्यांच्या घरी न पाठवता बाहेरच हॉटेल अथवा शासकीय व्यवस्थेत क्वारंटाईन करण्यासाठी यापूर्वी काहीच प्रयत्न केले नाहीत. वसमत येथील एकच रुग्ण असल्याने आधी काही भार नव्हता. आता रुग्ण वाढले तरीही अनेक परिचारिका घरी जावून येत होते. मागील तीन-चार दिवसांपासून काहींना क्वारंटाईन केले जात आहे. याकडे दुर्लक्ष झाले तर अनेकांच्या कुटुंबियांनाही बाधा होण्याची भीती आहे.