coronavirus : नोंदणी पद्धतीने विवाह करा आर्थिक मदत मिळवा; गर्दी टाळण्यासाठी औंढा नगरपालिकेची योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 06:38 PM2020-03-17T18:38:55+5:302020-03-17T18:43:08+5:30
औंढा तालुक्यात कोरोनाबाबत केल्या जाताहेत उपाययोजना
औंढा नागनाथ : तालुक्यात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी अंमलबजावणी केली जात असून ३१ मार्चपर्यंत नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्या दाम्प्त्यास औंढा नगरपंचायतीकडून आर्थिक मदत दिली जाणार असल्याची माहिती नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिली आहे.
औंढा नागनाथ तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुखांची व तालुका आरोग्य अधिकारी यांची विशेष बैठक तहसील कार्यालयात मंगळवारी घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नागरीकांनी थेट कार्यालयात न येता मोबाईल (व्हॉटस्अपर, ई-मेल ) याद्वारे तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कार्यालय प्रमुख यांना मेलद्वारे किंवा मोबाईल वर प्राप्त तक्रार निकाली काढण्याबाबत व संबधितास मोबाईलवर कळविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथ मंदिर हे भाविकांसाठी जिल्हाधिकारी आ.संतोष बांगर यांच्याशी चर्चा करुन नागनाथ मंदिर ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याच प्रमाणे ३१ मार्चपर्यंत तालुक्यातील आठवडी बाजार बंद राहणार असून नगरपंचायत क्षेत्रात कोरोनाबाबत जनजागृतीसाठी बॅनर व घंटागाडीच्या माध्यमातून आॅडिओ क्लिपद्वारे जनजागृती करण्यात येणार असून, नगरपंचायतीकडे उपलब्धतेनुसार नागरिकांना मास्कचे वाटप केले जाणार आहे. त्याच प्रमाणे राजकीय व धार्मिक कार्यक्रम एकत्रित करू नये, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच तालुक्यात नोंदणी पद्धतीने विवाह करण्यास प्रोत्साहीत केल्या जात आहे. याचाच भाग म्हणून औंढा नगरपंचायत हद्दीमध्ये ३१ मार्चपर्यंत नोंदणी करून विवाह करणाऱ्या दाम्प्त्यास नगरपंचायतीकडून आर्थिक मदत दिली जाणार असल्याची माहिती पांडुरंग माचेवाड यांनी दिली आहे.