coronavirus : पुण्यावरून परतलेला तरुण कोरोना संशयित; कळमनुरीत उपचार सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 02:08 PM2020-03-18T14:08:09+5:302020-03-18T14:09:35+5:30
प्रकृतीत सुधारणा दिसून आल्यास त्याला घरी निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे.
कळमनुरी ( हिंगोली ) : तालुक्यातील सालेगाव येथील एका युवकास कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे आढळून आली आहेत. त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत.
सालेगाव येथील २२ वर्षांचा युवक पुणे येथे एका कंपनीमध्ये कामावर होता. त्याला सर्दी, खोकला, श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने तो १७ मार्च रोजी आपल्या गावी परत आला. त्याला घरच्यांनी १७ मार्च रोजी रात्री १२.४५ वाजता येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ. राजशेखर मेनगुले हे व इतर वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर उपचार करीत आहेत. या संशयिताला उपजिल्हा रुग्णालयात कोरोना संशयितासाठी स्थापन केलेल्या वार्डात ठेवले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या रक्ताचे नमुने व स्वॅबचा नमुना पुणेच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. तपासणीची किट हिंगोली येथील सामान्य रुग्णालयातून मागविली आहे.
सध्या या युवकाची प्रकृती स्थीर आहे. प्रकृतीत सुधारणा दिसून आल्यास त्याला घरी निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. सर्दी, खोकला, श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याची लक्षणे आढळून आल्याने कोरोनाच्या वार्डात उपचार सुरू आहेत, अशी माहिती डॉ. फरीदा शेख यांनी दिली. हिंगोली जिल्ह्यात यापूर्वी दोन संशयित होते. ते निगेटिव्ह आढळले.