CoronaVirus : सहा जवानांनी दिला होता उपचारास नकार; प्रशासनाने समजावल्यानंतर झाले तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 06:20 PM2020-05-05T18:20:05+5:302020-05-05T18:20:43+5:30
वरिष्ठांनी समजावल्यानंतर ही मंडळी उपचारास राजी झाली.
हिंगोली : येथील एसआरपीएफच्या सहा जवानांनी शासकीय रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था नसल्याचे कारण सांगून उपचारासाठी नकार दिल्याने पेच निर्माण झाला होता. मात्र वरिष्ठांनी समजावल्यानंतर ही मंडळी उपचारास राजी झाली.
हिंगोली येथील १४ जवानांचा आज कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यापैकी सहा जणांनी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था नसल्याचे कारण सांगून उपचारासाठी नकार दिला होता. दुपारपर्यंत त्यांना समजवावे लागले. हिंगोली येथील या जवानांची आधीपासूनच त्यांच्या प्रशासनावर नाराजी होती. त्याचा परिणाम म्हणून जेवण व राहायच्या सुविधेवरून ही मंडळी तक्रारी करीत होती. अनेकदा या बाबींवरून या मंडळींनी रोषही व्यक्त केला. तर तक्रारींचा सूर अजूनही कमी व्हायला तयार नाही.
याबाबत एसआरपीएफचे जिल्हा समादेशक मंचक इप्पर यांना विचारले असता ते म्हणाले, आम्ही या जवानांना आता समजावले असल्याने ते उपचार घेण्यास रुग्णालयात रवाना झाले आहेत. त्यांच्या सुविधांचीही पुरेपूर काळजी घेतली आहे. या आजाराचा संसर्गाचा धोका मोठा असल्याने सर्व बाबी जिल्हा प्रशासन व जिल्हा रुग्णालयाच्या मार्गदर्शनाखाली केल्या. वेळोवेळी त्यात त्यांच्या सूचनांप्रमाणे बदलही केले. सुरुवातीलाच क्वारंटाईन करून आवश्यक त्या सूचनाही दिल्या. त्यामुळे जवानांची काही नाराजी असण्याचे काही कारण नाही. शेवटी अशा प्रकारची परिस्थिती व आजारही पहिल्यांदाच पाहात आहोत. कदाचित ते भांबावल्याने असे वागत असतील. मात्र सर्व जवानांची योग्य ती काळजी घेतली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.