CoronaVirus : तर...आता थेट गुन्हे दाखल केले जातील, जिल्हाधिकारी संतापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 02:29 PM2020-04-06T14:29:13+5:302020-04-06T14:30:47+5:30
अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त वाहने रस्त्यावर
हिंगोली : शहरात नागरिकांनी दुचाकी, चारचाकी वाहने बाजारात आणल्याने ६ एप्रिल रोजी वाहनांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी चांगलेच संतापले. त्यांनी रस्त्यावर उतरून वाहनांची तपासणी केली. शिवाय या वाहनांवर कार्यवाहीचे आदेश पोलिसांना दिले. यानंतर जर कोणी वाहने घेऊन गर्दी केल्यास थेट गुन्हे दाखल केले जातील असा इशाराही जिल्हाधिका-यांनी दिला.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ६ एप्रिल रोजी किराणा व भाजीपाला खरेदीसाठी मुभा देण्यात आली होती. त्यामुळे सोमवारी शहरात मोठी गर्दी झाली होती. परंतु १४ एप्रिलपर्यंत दुचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहने फिरण्यास बंदी घातली असून तसे जिल्हाधिका-यांनी आदेशही काढले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहनेच फिरू शकतील.
वैद्यकीय आपातकाल व्यतिरीक्त फिरणा-या लोकांना व वाहनांना नियंत्रित करण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेश काढून तशा सूचनाही दिल्या होत्या. परंतु ६ एप्रिल रोजी हिंगोली शहरात ठिकठिकाणी गर्दी दिसून आली. अनेक ठिकाणी सोशल डिस्टंसला नागरिकांनी तिलांजली दिल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी हे शहरातून फेरफटका मारत असताना त्यांना वाहनांची मोठी गर्दी दिसून आली. १४ एप्रिलपर्यंत दुचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहने फिरण्यास बंदी घालूनही नागरिक वाहनावरून बिनधास्त फिरताना त्यांना दिसून आले. हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी स्वत: वाहनांची तपासणी केली. तसेच संबंधित वाहनचालकांवर कार्यवाहीचे आदेश दिले. कारवाई दरम्यान शेकडो वाहने जप्त करण्यात आली. त्यामुळे वाहनांच्या चाव्याचा ढीग जमला होता. यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजणे, मुख्याधिकारी रामदास पाटील आदी उपस्थित होते.