डस्टबिन वाटपावरून मुख्याधिकाऱ्यास शिवीगाळ; नगरसेविकेसह दीरास कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 05:53 PM2021-12-01T17:53:32+5:302021-12-01T17:56:05+5:30
शिवीगाळ करून उलट जातिवाचक शिवीगाळचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
हिंगोली : नगरसेविकेसह तिच्या पती, दीर व इतर एकाने सेनगाव येथील मुख्याधिकाऱ्यास शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी नगरसेविका व तिच्या दीरास तीन महिने कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास कारावास भोगावा लागणार आहे.
या ११ जून २०१८ रोजी सेनगाव येथील नगर पंचायत कार्यालयात मुख्याधिकारी शैलेश फडसे हे काम करीत असताना दुपारी १.४५ च्या सुमारास बबन सुतार हे तेथे आले. डस्टबिन वाटपावरून विचारणा करून फडसे यांना शिवीगाळ करीत धमकी दिली. तुम्ही नगरसेवक नाहीत असे म्हटल्यानंतर ते निघून गेले. २.१० मिनिटांनी नगरसेविका अनुराधा सुतार, विजय सुतार व ज्ञानेश्वर कांबळे यांच्यासमवेत तेथे आले. नगरसेविका अनुराधा यांनीही शिवीगाळ केली. तसेच जातिवाचक शिवीगाळचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यावरून सेनगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंद झाला होता.
याबाबतचे दोषरोपपत्र दाखल झाल्यानंतर तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्यासमोर खटला चालला. यात बबन सुतार व अनुराधा सुतार यांना क. ३५३ प्रमाणे दोषी ठरवून तीन महिने कारावास व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली. तर कलम २९४ नुसार बबन सुतार यास तीन महिने कारावास व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावास, क. ५०६ (२) अन्वये बबन सुतार यास तीन महिने कारावास व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली. तर विजय सुतार व ज्ञानेश्वर कांबळे यांची निर्दोष मुक्तता केली. सरकार पक्षातर्फे ॲड. एस. डी. कुटे यांनी बाजू मांडली.