'कपाशीची बोंदरी, सोयाबीनला कोंब'; अतिवृष्टीने शेतकरी हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 05:38 PM2020-10-16T17:38:27+5:302020-10-16T17:40:17+5:30
Rain Hits Hingoli District यंदाही शेतकरी नागवला असून शासन मदतीकडे आस लावून बसला आहे.
हिंगोली : जून ते सप्टेंबर या ४ महिन्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिके नेस्तनाबूत झाली. निसर्गाचे हे दुष्टचक्र ऑक्टोबर महिन्यातही कायम असून दैनंदिन कोसळणाऱ्या परतीच्या पावसाने कपाशीची बोंडे काळवंडली तर सोयाबीनला कोंब फुटले आहेत. त्यामुळे यंदाही शेतकरी नागवला असून शासन मदतीकडे आस लावून बसला आहे.
जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वाधिक अर्थात २ लाख ४७ हजार ५५१ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झालेला आहे. त्याखालोखाल ४१ हजार ८०८ हेक्टरवर हळद, ३८ हजार ९६५ हेक्टरवर कापूस, ८ हजार २६८ हेक्टरवर मूग, ६ हजार ६११ हेक्टरवर उडीद याप्रमाणे पेरणी झालेली आहे. दरम्यान, सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर सुरूवातीला पिके अंकुरलीच नाहीत. बोगस बियाण्यांमुळे घडलेल्या या प्रकारामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. पिकांची वाढ जोमाने होत असतानाच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतशिवारांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्याने सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना चक्क कोंब फुटल्याचाही प्रकार घडला. अती पावसामुळे कपाशीची बोंडे काळे पडायला लागली; तर उडीद आणि मूगाचे ९० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे आणि आता परतीच्या पावसाने ठाण मांडल्याने पिकांचे प्रचंड नुकसान होत असून शेतकरी हतबल झाले आहेत.
भरपाई वाढवून द्यावी
माझ्याकडे १२ एकर शेती असून ४ एक सोयाबीन, ३ एकर कापूस, ५ एकर मूग, उडीद आणि ज्वारीचा पेरा केला आहे. पेरणी ६० ते ७० हजार रुपये खर्च आला. यापासून २ ते २.५० लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते; परंतु अतिवृष्टीमुळे सोयाबीन हातचे गेले आहे. आता नुकसान भरपाई निघणे शक्य नाही. एकरी २५ हजार रुपयांची मदत करायला हवी.
-प्रल्हाद मगर, घोळवा, ता. कळमनुरी
सोयाबीनच्या सुड्याही भिजल्या
अतिवृष्टीमुळे आधीच सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. उरल्यासुरल्याची कापणी करून सुडी रचून ठेवली आहे; मात्र परतीच्या पावसामुळे सुड्याही भिजत असून लागवड खर्चही वसूल होणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे २ लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
- शिवाजी बाभूळकर, शेतकरी, घोडा, ता. कळमनुरी
पीक पंचनामे सुरू आहेत
हिंगोली जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या ४ महिन्यात अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे केले जात आहेत; मात्र परतीच्या पावसामुळे त्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. गरज नसताना कोसळत असलेल्या पावसामुळे नुकसानीच्या प्रमाणातही वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
- व्ही.डी. लोखंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली