अतिगंभीर रुग्णांच्या नातेवाइकांची ओरड कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:28 AM2021-05-01T04:28:30+5:302021-05-01T04:28:30+5:30
हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात तीनशेपेक्षा जास्त गंभीर रुग्ण आहेत. त्यात ५० पेक्षा जास्त रुग्णांची अवस्था तर अत्यंत बिकट आहे. काहींना ...
हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात तीनशेपेक्षा जास्त गंभीर रुग्ण आहेत. त्यात ५० पेक्षा जास्त रुग्णांची अवस्था तर अत्यंत बिकट आहे. काहींना तर जागचेही हलता येत नाही. अशा परिस्थितीत या रुग्णांना काही लागले तर त्यांची विचारपूस करण्यासाठी नातेवाईक तरी सोबत असायचे. मात्र काहीजणांनी सकाळी एक, दुपारी दुसरा, तर सायंकाळी तिसराच नातेवाईक सोबत ठेवण्याचा प्रकार चालविला. तसेच हे सर्व बाहेर येऊन समाजात मिसळतही असल्याने प्रशासनाने हेच कारण पुढे करून सर्वच रुग्णांच्या नातेवाइकांना तेथून हाकलले. काहींना लिंबाळा येथे क्वारंटाईन केले. काहीजण दुसऱ्या दिवशी पुन्हा हजर झाले. काहींचे इतर नातेवाईक चकरा मारीत आहेत. मात्र त्यांना आता थांबू दिले जात नसल्याने ओरड वाढली आहे. अनेकजण यावरून आमचा रुग्ण आधीच अतिगंभीर परिस्थितीत आहे. तो दगावला कसा? असा सवाल करून भांडावून सोडत आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनीच कडक भूमिका घेतल्याने आता यापुढे कुणाचेही काही चालत नाही. रात्रीच्या वेळी रुग्णांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होते, असाही आरोप रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत.
... तर फौजदारी दाखल करू
नातेवाइकांनी रुग्णासमवेत थांबणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही. यापुढे तर अशा लोकांवर थेट फौजदारी कारवाई करू. अतिगंभीर रुग्णांना जागचे हलता येत नसेल तर त्यांना अडल्ट डायपर दिले जाईल. त्यासाठी वाॅर्डबाॅय नेमले आहेत. आमच्या कर्मचाऱ्यांच्याही हालचालींवर आमचे लक्ष आहे. रुग्णांची देखभाल करणे ही त्यांचीच जबाबदारी आहे. जर नातेवाइकांना हे करावे लागत असेल तर आमची यंत्रणा कशासाठी आहे? या यंत्रणेने व्यवस्थित लक्ष न दिल्यास कारवाई करू. त्यामुळे नातेवाइकांनी रुग्णांची चिंता करू नये, असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले.
मग नेत्यांसाठी कोरोना वाॅर्ड पर्यटनस्थळ आहे का?
रुग्णांच्या नातेवाइकांना आतमध्ये प्रवेश करू दिला जात नाही. मात्र पुढारी, नेतेमंडळी आपल्या कार्यकर्त्यांचा फौजफाटा घेऊन आतमध्ये जातात. शिवाय अनेकजण गल्लीबोळांतील कार्यकर्तेही आजकाल रुग्णालयात जाऊन मदत केल्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकतात. या सर्वांना प्रवेश मिळतो. मग ते काय पर्यटनस्थळ म्हणून दौरा करीत आहेत का? त्यांच्यामुळे कोरोना पसरत नाही का? आम्हीच काय घोडे मारले? असा सवाल एकाने नाव न छापण्याच्या अटीवर केला.
एक ठरावीक नातेवाईक ठेवण्यास परवानगी द्यावी
जे रुग्ण बायपॅप किंवा व्हेंटिलेटरवर आहेत ते आपल्या जागेवरून हलू शकत नाहीत. चालले तर त्यांना चक्कर येते. ते जर चालले तर धोका होऊ शकतो. शिवाय कितीही म्हटले तरीही नातेवाइकांशिवाय इतर कुणी डायपर बदलू शकत नाही. जेवण देणारा, नाष्टा देणारा, चहावाला बेडजवळ जाऊन जेवण देत नाही. ते घ्यावेच लागते. तेच जर नातेवाईक जवळ असल्यास ते जेवण घेऊन खाऊ घालतात. या आजारात भूक अत्यंत मंदावते. त्याला जबरीने खाऊ घालावे लागते. हे नर्सेस करू शकत नाहीत. बाहेरून औषधेही मागवावी लागतात. या आजारात नातेवाईक सोबत राहणे चुकीचे आहे. मात्र एखादा नेमून दिलेला नातेवाईक योग्य नियम पाळून, रुग्ण सोडताना कोरोनाची चाचणी करण्याच्या अटीवर ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी डॉ. गजानन धाडवे यांनी केली.