भगवा रुमाल टाकून मतदान केंद्रात अनधिकृत प्रवेश; शिवसेना आमदारावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 12:48 PM2021-12-22T12:48:27+5:302021-12-22T12:49:36+5:30
Shiv Sena MLA Santosh Bangar: स्वत:च्या गळ्यात भगवा रुमाल टाकून मतदानावर प्रभाव पडेल, अशा पद्धतीने त्यांनी मतदान केंद्रात प्रवेश केला.
हिंगोली : औंढा नागनाथ येथे नगरपंचायत निवडणुकीचे मतदान सुरू असताना प्रभाग क्र.५ मधील नागनाथ कनिष्ठ महाविद्यालय या मतदान केंद्रात अनधिकृत प्रवेश करून मतदारांवर प्रभाव पडेल, असे कृत्य केल्याप्रकरणी आमदार संतोष बांगर (Shiv Sena MLA Santosh Bangar ) यांच्याविरुद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
मंगळवारी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना आमदार संतोष बांगर हे दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास आपल्या १० ते १५ कार्यकर्त्यांसह नागनाथ कनिष्ठ महाविद्यालयातील खोली क्र. ५ मध्ये मतदान केंद्रावर गेले. तेथे त्यांच्यासमवेत अंगरक्षकही होते. स्वत:च्या गळ्यात भगवा रुमाल टाकून मतदानावर प्रभाव पडेल, अशा पद्धतीने त्यांनी मतदान केंद्रात प्रवेश केला. यावरून मतदान केंद्राध्यक्ष तथा आमदरी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दयानंद संभाजी कल्याणकर यांच्या फिर्यादीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
औंढ्यातील मतदानप्रक्रिया रद्द करा
या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याचे सांगून भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर प्रशासनाने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच औंढा येथील प्रभाग क्रमांक पाचमधील मतदान केंद्रावर हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथील प्रक्रिया रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे मुंबईत करणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षकांकडे तोंडी तक्रार केल्याचे सांगितले, तर औंढ्यात इतर ठिकाणीही त्यांनी बुथवर ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचे ऐकिवात असून, सर्वच प्रक्रिया रद्द करण्याची मागणीही करणार असल्याचे सांगितले.