ऐन रबी हंगामात शेतकऱ्यावर संकट; शॉर्टसर्किटमुळे ५ एकरांतील ऊस जळून खाक
By विजय पाटील | Published: November 22, 2023 01:18 PM2023-11-22T13:18:04+5:302023-11-22T13:23:20+5:30
वसमत तालुक्यातील लोहगाव शिवारातील घटना
हिंगोली: वसमत तालुक्यातील लोहगाव शिवारात बुधवारी शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागली. या आगीमध्ये शेतकऱ्याचा ५ एकरांवरील ऊस जळून खाक झाला. सदरील आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. परंतु आग आटोक्यात आली नसल्यामुळे ऊस पूर्णत: जळून खाक झाला. ऐन रबी हंगामात ऊस जळाल्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
वसमत तालुक्यातील लोहगाव शिवारात २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:२० वाजेदरम्यान शॉर्टसर्किटमुळे कुलदीप टाक यांच्या ५ एकरांमधील ऊसाला आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले होते. ही माहिती कळताच शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी अग्नीशामक विभागाला फोन करुन अग्नीशामक गाडी बोलावून घेतली. परंतु तोपर्यंत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.
खरीप हंगामातील पिकांना म्हणावा तसा भाव मिळत नाही म्हणून शेतकरी अगोदरच चिंतेत आहेत. त्यात उसाला लागलेली आग हे मोठे संकट शेतकऱ्यापुढे उभे ठाकले आहे. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न शेजारच्या शेतकऱ्यांनी केला. परंतु आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे पाच एकरातील ऊस पूर्णत: जळून गेला. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही शर्थीचे प्रयत्न केले.