पैसे भरले पण खात्यात रक्कम नाही; बुलढाणा अर्बनच्या कळमनुरी शाखेत लाखोंचा घोटाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 07:10 PM2023-07-17T19:10:52+5:302023-07-17T19:13:20+5:30
तत्कालीन मॅनेजर, कॅशियरसह अन्य दोघांची मिलीभगत
- इलियास शेख
कळमनुरी (हिंगोली): येथील बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कळमनुरी शाखेत जवळपास एक कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शाखा व्यवस्थापक व रोखपालाने खातेदारांनी दिलेली रोकड खात्यात जमा न करता परस्पर लांबवत लाखोंचा घोटाळा केल्याचे उघडकीस आला आहे.
याप्रकरणी रोखपाल गजानन कुलकर्णी व शिपाई अविनाश देशपांडे या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शाखाव्यवस्थापक वसंत घुगे व रोखपाल संजय भोयर हे दोघे फरार आहेत. येथील शाखेत कार्यरत असलेले तत्कालीन शाखा व्यवस्थापक वसंत घुगे व रोखपाल संजय भोयर ,गजानन कुलकर्णी यांनी संगनमत करून खातेदारांच्या खात्यात अफरातफर करत परस्पर रक्कम उचलल्याचे सांगण्यात येत आहे. खातेदार रक्कम जमा करण्यासाठी आले असता स्लीपवर शिक्का, स्वाक्षरी दिली. परंतु, प्रत्यक्षात रक्कम त्यांच्या खात्यात जमाच केली नाही. अपहार झाल्याची माहिती मिळताच खातेदारांनी शाखेत एकच गर्दी केली. सर्वजण खाते तपासून घेत होते. यावेळी खात्यात रक्कम जमा नसल्याचे कळाल्याने अनेक खातेदार हताश झाले.
दरम्यान, शाखा व्यवस्थापक वसंत घुगे यांची बदली औंढा नागनाथ येथे झाली. त्यानंतर शाखा व्यवस्थापक संदीप लोंढे व विभागीय व्यवस्थापक गजानन रहाटे येथे रुजू झाले. खात्यात कमी रक्कम असल्याचे दिसून आल्याने काही खातेदारांनी शाखाधिकाऱ्यांना याबाबत विचारले. तपासणी अंती अनेक खात्यात रक्कम जमाच केली नसल्याचे उघडकीस आले. हा अपहार तब्बल एक कोटी रुपयांचा असल्याचा अंदाज आहे. अपहराच्या तपासणीसाठी सोसायटीचेच नांदेड येथील आठ कर्मचारी आले आहेत.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, शालिनी गजभारे, गजानन होळकर प्रशांत शिंदे ,नागोराव होडगीर , देविदास सूर्यवंशी गुलाब जाधव हे शाखेत आले. त्यांनी रोखपाल गजानन कुलकर्णी व शिपाई अविनाश देशपांडे या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
अनेक खातेदारांनी सोने तारण ठेवलेले आहे. सर्व सोने सुरक्षित आहे. याची तपासणी दर आठ दिवसाला होते. त्यामुळे खातेदारांनी कोणतीही काळजी करू नये. दोन ते तीन दिवसांत किती रकमेचा अपहर झाला हे लक्षात येईल.
- प्रफुल्ल संचेती, विभागीय व्यवस्थापक बुलढाणा क्रेडिट सोसायटी