औंढा नागनाथ येथे आषाढी एकादशी निमित्त भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 02:36 PM2018-07-23T14:36:25+5:302018-07-23T14:47:49+5:30
आषाढी एकादशी निमित्ताने ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी आज पहाटे पाच वाजल्यापासूनच गर्दी केली.
औंढा नागनाथ (हिंगोली ) : आषाढी एकादशी निमित्ताने ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी आज पहाटे पाच वाजल्यापासूनच गर्दी केली.
औंढा नागनाथ येथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग आहे शिवाय येथे संत नामदेव व विठ्ठल रुख्मिणी चे मंदिरही आहे. या मंदिरात पहाटे 5:30 वाजता आषाढी एकादशी निमित्ताने तहसीलदार पांडुरंग माचेवाड व विश्वात पुरुषोत्तम देव यांनी सपत्नीक महापूजा केली. या वेळी विश्वस्थ गजानन वाखरकर, गणेश देशमुख उपस्थित होते. पूजेनंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.
आज पावसाची उघड असल्याने पहाटे ५ वाजल्यापासूनच भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली. भाविकांच्या सुलभतेसाठी दर्शन रांग व शुद्ध पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी संस्थांनच्या वतीने संत नामदेव महाराज सभागृहात भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. तसेच भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याशिवाय गोकर्ण महादेव मंदिर, जुना नागनाथ येथील महादेव मंदिर येथेही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.