पिंपळदरी शिवारात गांजाची शेती; २० किलो गांजा जप्त, दोन जणांवर कारवाई
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: May 5, 2023 07:26 PM2023-05-05T19:26:09+5:302023-05-05T19:27:16+5:30
पिंपळदरी शिवारात गांजाची शेती होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.
हिंगोली : तालुक्यातील पिंपळदरी शिवारात दोघांकडून पोलिसांनी १ लाख ८९ हजार १८४ रूपये किमतीचा २० किलो गांजा जप्त केला. ही कारवाई ५ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास करण्यात आली.
पिंपळदरी शिवारात गांजाची शेती होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांचेसोबत तहसीलदार नागनाथ वगवाड, पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने यांच्या पथकाने पिंपळदरी शेत शिवार गाठले. तेथे ५१/३ व ५१/८ या गटशिवाराची पाहणी केली.
यावेळी गट क्र. ५१/३ मधील अंबादास सोनटक्के यांच्या शेतात १९ किलो १५८ ग्रॅम वजनाची व १ लाख ५३ हजार २६४ रूपयांची गाजांची झाडे आढळून आली. तसेच गट क्र. ५१/८ मध्ये माधव सोनटक्के यांच्या शेतात आखाड्यावर एका थैलीमध्ये १ किलो ७९६ ग्रॅम वजनाचा व ३५ हजार ९२० रूपये किमतीची गांजाची अर्धवट वाळलेली पाने व फुले आढळून आली. पोलिसांनी १ लाख ८९ हजार १८४ रूपये किमतीचा मुद्देमालासह दोघांनाही ताब्यात घेतले. याप्रकरणी अंबादास सोनटक्के व माधव सोनटक्के याचेविरूद्ध बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू होती.
ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, पोलिस अंमलदार भगवान आडे, गजानन पोकळे, लिंबाजी वावळे, नितीन गोरे, किशोर सावंत, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघन, विशाल खंडागळे, आझम प्यारेवाले, सुमित टाले, शेख जावेद, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली.