कापसाच्या पिकात गांजाची लागवड; पावणे अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: November 11, 2023 04:26 PM2023-11-11T16:26:12+5:302023-11-11T16:27:24+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची हापसापूर शिवारात कारवाई
हिंगोली : कापसाच्या पिकात लागवड केलेली गांजाची १० लाख ८० हजार रूपये किमतीची २३५ झाडे जप्त केली. वसमत तालुक्यातील हापसापूर शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १० नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई केली. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा दोघांवर गुन्हा नोंद झाला.
वसमत तालुक्यातील हापसापूर शेत शिवारात एका कापसाच्या पिकात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी कारवाई करण्याच्या सूचना पथकाला दिल्या. सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या व हट्टा पोलिसांच्या पथकाने १० नोव्हेंबर रोजी हापसापूर शिवारात छापा टाकला. या वेळी कापसाच्या पिकामध्ये ठरावीक अंतरावर गांजाची २३५ झाडे आढळून आली. पंचासमक्ष या झाडांचे वजन केले असता ४५ किलो ६० ग्रॅम भरले. जवळपास १० लाख ८० हजारांची गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली.
यात पोलिसांनी शेत मालक गुलाब तुळशीराम संवडकर व आदर्श गुलाब संवडकर (दोघे रा. हापसापूर ता. वसमत) यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी दोघांवर हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, स्थागुशाचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, हट्टा ठाण्याचे सपोनि गजानन बोराटे, पोलिस अंमलदार शेख बाबर, विठ्ठल कोळेकर, गजानन पोकळे, नरेंद्र साळवे, आकाश टापरे, तुषार ठाकरे, जीवन गवारे, भागोराव दिंडे, असेफ शेख यांच्या पथकाने केली.
स्थानिक गुन्हे शाखेची सलग तिसरी कारवाई
पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अवैध धंद्याविरूद्ध कारवाईची कडक भूमिका घेतली आहे. गांजाची लागवड, त्याची वाहतूक वा विक्री करणाऱ्यांविरूद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कडक कारवाई करीत आहे. यापूर्वीही सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने कारवाई करून हजारो रूपयांचा गांजा जप्त केला होता.