३ दिवसांत आगाराचे १० लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:44 AM2018-01-05T00:44:43+5:302018-01-05T00:46:32+5:30
कोरेगाव भीमा येथील घटनेमुळे मागील ३ दिवसांपासून येथील एस.टी. आगारातून बसेस सोडल्या नाहीत. त्यामुळे तीन दिवसांत आगाराचे १० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आगारप्रमुख एस.ए. आझादे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : कोरेगाव भीमा येथील घटनेमुळे मागील ३ दिवसांपासून येथील एस.टी. आगारातून बसेस सोडल्या नाहीत. त्यामुळे तीन दिवसांत आगाराचे १० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आगारप्रमुख एस.ए. आझादे यांनी दिली.
येथील आगारातून २ जानेवारी रोजी फक्त ७ फेºयाच सोडण्यात आल्या. ३ जानेवारी रोजी आगारातून एकही बस सोडली नाही तर ४ रोजी फक्त ९ बस फेºया सोडल्या. या आगारात ३९ बसेस आहेत. दररोज १८४ बसफेºया होतात. आगाराचे दररोजचे उत्पन्न साडेतीन ते चार लाख रुपये येते. बसेस तीन दिवसांपासून बंद असल्याचे आगाराचे १० लाखांचे नुकसान झाले. माजलगाव येथील एका एस.टी. बसची तीन दिवसांपूर्वी तोडफोड केली. एस.टी. बसेस बंद असल्यामुळे बसस्थानकावरची गर्दीही ओसरली आहे. अवैध वाहतुकीच्या वाहनाने प्रवासी प्रवास करत आहेत. ४ जानेवारी रोजी नांदेडसाठी तीन, परभणीसाठी ४ व पुसद मार्गावर बसेस सोडल्या. बसेस केव्हा सुरू होतील, अशी विचारणा प्रवासी करत आहेत. ५ जानेवारीपासून पूर्ववत सर्व बसफेºया सोडण्यात येणार असल्याचे आगार प्रमुख आझादे यांनी सांगितले. विशेष म्हणजे या बंदमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. त्यामुळे अनेकांनी तर बाहेर निघणेच टाळले होते. तर काही खाजगी वाहनांकडे धाव घेत होते.
तारांबळ : अनेकांनी टाळले बाहेर पडणे
कोरेगाव भीमाच्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्टÑात बंद पाळला आहे. त्याच पार्श्वभूमिवर बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. शिवाय, खाजगी वाहतूकही बंद असल्याने या काळात आगाराचे तर नुकसान झालेच आहे. त्याचबरोबर प्रवाशांचीही मोठी तारांबळ झाली होती. प्रवासी खाजगी वाहनाकडे
धाव घेत होते. मात्र मोजक्याच मार्गावरुन वाहतूक सुरु होती. तर जिल्ह्यात ४ जानेवारी रोजी निघलेल्या मोर्चामुळे खाजगी वाहतूक सेवाही ठप्प होती. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता. तर महत्त्वाचे काम असणारेच प्रवासी प्रवास करीत होते.
कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्टÑभर बंद पाळण्यात आला होता. परंतु ५ जानेवारीपासून बससेवा सुरु होणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.