नुकसान ४० हजार, भरपाई फक्त १ हजार; शेतकऱ्याने शासनाला परत केली रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 06:44 AM2022-11-05T06:44:01+5:302022-11-05T06:44:18+5:30
जयपाल प्रकाश भांडारकर असे या व्यथित शेतकऱ्याचे नाव असून ते लाखांदूर तालुक्यातील किरमटी येथील रहिवासी आहेत.
विरली (जि. भंडारा) : गतवर्षी रब्बी हंगामात झालेल्या गारपिटीची तब्बल वर्षभराने नुकसान भरपाई मिळाली. ४०,००० हजार रुपयांचे नुकसान झाले असताना प्रत्यक्षात मदतीपोटी केवळ एक हजार रुपये बँक खात्यात जमा झाले. ही तुटपुंजी मदत पाहून शेतकऱ्याचा संताप इतका अनावर झाला की, त्याने गुरूवारी एक हजार रुपये लाखांदूर तहसील कार्यालयाच्या बँक खात्यात जमा करून शासनाला परत केले.
जयपाल प्रकाश भांडारकर असे या व्यथित शेतकऱ्याचे नाव असून ते लाखांदूर तालुक्यातील किरमटी येथील रहिवासी आहेत.
जयपाल भांडारकर यांची गट क्र. ६२/२ मध्ये ०.४० हेक्टर शेती आहे. गतवर्षी रब्बी हंगामात तालुक्यात गारपीट झाली. शेकडो शेतकऱ्यांसह जयपाल यांच्याही शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने गारपीटग्रस्तांना मदत घोषित केली. महसूल व कृषी विभागाने सर्वेक्षण करून अहवाल सादर केला. यादीत जयपाल यांचेही नाव होते. भरपाई मिळण्यास वर्ष उलटले.
रक्कम खात्यात जमा झाली. किती ? तर केवळ एक हजार रुपये. ही तुटपुंजी रक्कम पाहून भांडारकर उद्विग्न झाले. ही मदत शासनाला परत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी तडक लाखांदूर तहसील कार्यालय गाठून शासनाच्या बँक खात्यात एक हजार रुपये जमा केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर लाखांदूर तहसीलदार वैभव पवार यांची भेट घेऊन त्यांना तसे निवेदनही दिले. भांडारकर यांची ही भूमिका चर्चेचा विषय झाली आहे. भांडारकर यांच्याशिवाय अनेक शेतकऱ्यांना अशीच एक-दोन हजार रुपये भरपाई मिळाली आहे.
०.४० हेक्टरवरील हरभरा पिकाचे गारपिटीने पूर्णतः नुकसान झाले. लागवडीचा खर्चही निघाला नाही. पंचनामा कमी क्षेत्राचा दाखविल्याने तुटपुंजी रक्कम मदत म्हणून मिळाली. त्यामुळे ती मी परत केली. - जयपाल प्रकाश भांडारकर