हळद व गहू पिकाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:55 AM2021-02-18T04:55:24+5:302021-02-18T04:55:24+5:30
रस्त्याचे काम अर्धवटच फाळेगाव : गावापासून ते फाळेगाव फाट्यापर्यंतच्या रस्त्याचे अंतर अडीच किमी आहे. या रस्त्याचे केवळ दीड किमीपर्यंतचे ...
रस्त्याचे काम अर्धवटच
फाळेगाव : गावापासून ते फाळेगाव फाट्यापर्यंतच्या रस्त्याचे अंतर अडीच किमी आहे. या रस्त्याचे केवळ दीड किमीपर्यंतचे काम करण्यात आलेले असून, उर्वरीत १ किमी काम मधातच सोडून देण्यात आले आहे. अर्धवट रस्ता पूर्णपणे उखडला असून जागोजागी खड्डे पडले आहे. याचबरोबर या रस्त्यातील गिट्टीही उघडी पडली असून या रस्त्यावर नेहमी धुळीचे वातावरण राहत आहे.
महामार्गाचे काम संथगतीने
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावातून पुसदकडे जाणाऱ्या महामार्गाचे काम संथगतीने होत आहे. मागील दीड वर्षभरापासून याठिकाणचे काम होत आहे. या रस्त्याकाठी अनेक शेतकऱ्यांची शेती असून रस्त्यावर नेहमी राहणारी धुळ ही शेतातील पिकांवर येत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी या मार्गाचे काम जलद गतीने व्हावे अशी मागणी होत आहे.
पाण्यासाठी नागरिकांची भटकंती
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावातील अनेक बोअर, विहीर कोरडे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र ठिकाणी भटकंती करावी लागत आहे. बरेच नागरिक पाणी गावात पाणी मिळत नसल्याने शेतशिवारातील विहीरीसह शेजारील गावातून पाणी आणताना दिसून येत आहेत.
आंबा मोहरला
संतुक पिंपरी : सध्या उन्हाळ्याची सुरूवात झाली आहे. उन्हाळ्यात सर्वात मोठ्या प्रमाणावर मागणी असते ते म्हणजे आंबा या पिकाची. सध्या शेतशिवारासह विविध भागातील आंब्याचे झाडे मोहरली असून यंदा आंबा मोठ्या प्रमाणावर नागरिकांना चाखायला मिळणार असे दिसून येत आहे.
गतीरोधक बसविण्याची मागणीहिंगोली : शहरातील आदर्श कॉलेज ते पाण्याच्या टाकीजवळ नवीन सिमेंट रस्त्याचे काम झाले आहे. हा रस्ता नवा असल्याने वाहनधारक आपले वाहने जोराने पळवित आहे. विशेष म्हणजे या रस्त्याकाठी अनेक नागरिकांचे घरे असून धावत्या वाहनांमुळे याठिकाणी अपघात होण्याची शक्यता असून याठिकाणी गतीरोधक उभारण्याची मागणी वाढली आहे.
टरबूज पिकाची आवक वाढली
हिंगोली : मागील चार दिवसांपासून हिंगोली बाजारपेठेत टरबुज पिकाची मागणी वाढली असल्याने शहरात टरबुज पिकाची आवक वाढली आहे. उन्हाळाच्या सुरूवातीलाच नागरिकांकडून टरबूज पिकाला मोठी पसंती मिळत आहे. अनेक हातगाडे व फळ विक्रेत्यांजवळ विक्रीसाठी टरबूज पिक आले आहेत.
अल्पवयीन वाहनचालक वाढले
हिंगोली : शहरातील गांधी चौक, रिसाला नाका, इंदिरा गांधी चौक आदी शहरातील मुख्यठिकाणी अनेक अल्पवयीन मुले वाहन चालवितांना दिसून येत आहे. याचा परिणाम शहरातील सुज्ञ नागरिकांना वाहन चालवितांना होत आहे. अनेकदा वाहन व्यवस्थित चालवून देखील हे अल्पवयीन चालक आपले वाहन ओबडढोबड चालवून नागरिकांच्या वाहनास धडक देत असल्याचे दिसत आहे.
शहरातील घाणीकडे दुर्लक्ष
हिंगोली : शहरातील भाजीमंडई, जिल्हा रुग्णालय, अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर, गांधी चौकातील काही भागात केरकचऱ्यासह दुर्गंधीमय पदार्थ टाकण्यात येत आहे. यामुळे शहरात घाण पसरत आहेत. याकडे नगर पालिकेने लक्ष देवून येथील साफसफाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.