टंचाईच्या बैठकीला दुसऱ्यांदाही दांडीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:56 AM2018-04-10T00:56:39+5:302018-04-10T10:46:54+5:30
तालुक्यातील बहुतांश गावातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत.तर प्रशासन आढावा बैठका घेण्यावर जोर देत आहे. मागील बैठकीला दांडी मारलेल्या अधिकाºयांमुळे बैठक अर्ध्यावरच गुंडाळली होती. तेच अधिकारी याही बैठकीला गैरहजर असल्याने यावरुन अधिकाºयांवर लोकप्रतिनिधीचा असलेला वचक बैठकीत दिसून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील बहुतांश गावातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत.तर प्रशासन आढावा बैठका घेण्यावर जोर देत आहे. मागील बैठकीला दांडी मारलेल्या अधिकाºयांमुळे बैठक अर्ध्यावरच गुंडाळली होती. तेच अधिकारी याही बैठकीला गैरहजर असल्याने यावरुन अधिकाºयांवर लोकप्रतिनिधीचा असलेला वचक बैठकीत दिसून आला.
हिंगोलीतील कल्याण मंडपम् येथे मागच्या वेळी रद्द झालेली पाणीटंचाई आढावा बैठक तान्हाजी मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आ. डॉ. संतोष टारफे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीला जि. प. व पं. स. सदस्यांसह तालुक्यातील अनेक गावातील सरपंच, सरपंच पती, ग्रामसेवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. याही बैठकीत मागचेच पाढे वाचण्यात आले. नवीन असे काहीच नसताना कोथळज येथील विंधन विहिरीचा प्रश्न चांगलाच चर्चिला गेला. तेथे बोअर पाडून वर्ष लोटले तरीही त्या ठिकाणी हातपंपच बसविला नसल्याने पाणीप्रश्न गंभीर बनल्याचे सांगितले. तसेच याही बैठकीत जि. प. सदस्य विठ्ठल चौतमल यांनी तालुक्यातील विविध समस्यांचा मांडताना सौर उर्जांच्या पंपांची संख्या विचारली. मात्र ती काही सांगताच आली नाही. तर मागील वर्षी अधिग्रहण केलेल्या शेतकºयांच्या खात्यावर अजून रक्कम पडलेली नसल्याने प्रभारी जि. प. सीईओ ए.एम.देशमुख यांना आ. तान्हाजी मुटकुळे यांनी फोन लावून स्पिकर आॅन करुन पैसे खात्यावर टाकण्याची तारीख विचारली. तर अधिग्रहणाचे प्रस्ताव आलेल्या ठिकाणी अधिकाºयांनी भेटी देण्याच्या सूचना दिल्या. फक्त आठ दिवसांत अधिग्रहणाच्या प्रस्तावांवर सर्व प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे, असेही खडसावून सांगितले. सोमवारीच जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक असल्याने प्रतिनिधी बैठकीच्या ठरलेल्या वेळेवर पोहोचू शकले नव्हते. त्यामुळे अनेक सरपंचांनी या ठिकाणाहून काढता पाय घेण्याची तयारी केली होती. परंतु; उशिरा का होईना आ. मुटकुळे आल्यानंतर कुठे इतरत्र घोळक्या-घोळक्याने बसलेले सरपंच व ग्रामसेवक बैठकीत आले. या बैठकीस मात्र प. सं. सभापती विलास काठमोडे, गणाजी बेले, दिलीप घुगे यांची उपस्थिती होती.
तोंडसुखावर भर
आ. रामराव वडकुते यांनी मागील बैठकीत उपस्थित अधिकाºयांची हजेरी घेतली होती. तर यांत्रिकी विभागाचे कुंभारीकर गैरहजर असल्याने त्यांनी पाठविलेल्याही प्रतिनिधीला काहीच माहिती नसल्याने नवीन बैठक घेण्याचे सुचविले होते. त्यानुसार सोमवारी घेतलेल्याही खेळीमेळी बैठकीत तोंडसुख घेण्यावरच भर देण्यात आला. आ. डॉ. संतोष टारफे यांनी तालुक्यात पाणीपातळी कमी झाली आहे. त्यामुळे संबंधित गावातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रा. पं. सदस्यांनी पाण्यासाठी उपयोजना करण्यास सांगितले. तर पाणीच उपलब्ध नसेल तर अधिग्रहण किंवा टँकरचे प्रस्ताव वेळीच शहदर करावे, अधिकारी दुर्लक्ष करत असतील तर स्वत: आम्हाला फोन करण्याच्याही सूचना दिल्या.