वृत्तपत्र विक्रेत्यांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:57 AM2018-09-26T00:57:22+5:302018-09-26T00:58:03+5:30
राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता २५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता २५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले.
राज्य संघटनेच्या शिष्टमंडळाने नागपूर येथे १६ जुलै २०१८ रोजी कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी १५ आॅगस्टपासून नोंदणीचे आश्वासन दिले. परंतु अद्याप कल्याणकारी मंडळाच्या कामाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे राज्यभरात आज हे आंदोलन आले. हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही आंदोलन केले.
असंघटित कामगार म्हणून वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी तत्काळ सुरू करा, मंडळाच्या कामकाजासाठी आवश्यक त्या प्रशासकीय सेवा सुविधा देऊन मंडळ कार्यान्वित करावे, असंघटित कामगार वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी तातडीने भरीव तरतूद करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर केले. निवेदनावर सुभाष अपूर्वा, काशीनाथ कदम, हरिष किर्तीवार, संदीप पाचमासे, अमित कंठे, शेख शकील, गजानन तळवणकर, सुरेश पाईकराव, माणिक पंडित, कैलास खिल्लारे, दिनकर घुबडगे, वसंत पाटील, शिवाजी जामुंदे, प्रमोद बांडे, आशिष सावजी, केशव भालेराव, गजानन काठोळे आदींच्या सह्या आहेत.